भीमाशंकर, (वार्ताहर) : आंबेगाव तालुक्यातील 12 ग्रामपंचायत व लगतच्या वाड्यावस्त्यांना दुष्काळ परिस्थितीमुळे पाणी मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. या संबंधित ग्रामपंचायत व वाड्यावस्त्यांवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने पिण्यासाठी पाणी पंचायत समिती आंबेगाव यांच्या मार्फत पाण्याचे 16 टँकर पुरविण्यात आले असून 15 विहिरी अधिग्रहित केल्या असल्याची माहिती गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी दिली.

आंबेगाव तालुक्यामध्ये सध्या बहुतेक ठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाली आहे. यामध्ये धामणी, मांदळेवाडी, पारगाव तर्फे खेड, कुरवंडी, वडगावपिर, कारेगाव, पहाडदरा, भावडी, गोहे बुद्रुक, जांभोरी, आसाणे, साकेरी, पिंपरी, लोणी, फलोदे, तळेघर, थुगांव या 29 हजार 67 लोकसंख्या असलेल्या 12 ग्रामपंचायती व लगतच्या 84 वाड्यावस्त्यांसाठी 16 टँकरने पाणीपुरवठा चालू करण्यात आला असून यासाठी 1 शासकीय व 15 खाजगी टँकर आहे. त्याचप्रमाणे 15 विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

दरम्यान पाण्याचे टँकर चालू करावे यासाठी कुशिरे खुर्द व बुद्रुक, बोरघर, फुलवडे, तिरपाड, पेठ, उगलेवाडी, महाळुंगे पडवळची ठाकरवाडी, तांबडेमळा या 9 ग्रामपंचायतींचे प्रस्ताव मंजुरीसाठी आले आहेत. संबंधित प्रस्तावांना मंजुरी मिळताच त्या ठिकाणी पाण्याचे टँकर चालू करण्यात येणार आहेत. तसेच ज्या गावांना पाण्यासाठी दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. त्यांनीही आपले प्रस्ताव पंचायत समिती आंबेगाव येथे लवकरात लवकर दयावेत, असे आवाहन गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा