झापोरिझ्झिया : युक्रेनच्या सैन्याने बुधवारी पूर्व भागातील खार्किव येथील चार गावातून रशियन सैनिकांना हुसकावून लावले असून, तेथील गॅसपुरवठा केंद्र ताब्यात घेतले आहे. तसेच तेथील पुरवठा बंद करून रशियाची कोंडी केली आहे.

24 फेब्रुवारीनंतर प्रथमच युकेनच्या सैनिकांनी हा छोटासा विजय मिळविला असल्याचे रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी मान्य केले.
नोव्होपस्कोव्ह, असे या केंद्राचे नाव आहे. हे केंद्र रशिया समर्थक बंडखोरांच्या ताब्यात होते. तेथून आता गॅसपुरवठा बंद केला जाणार आहे. रशियाचे हे तिसरे मोठे केंद्र आहे. तेथून युक्रेनमार्गे पश्‍चिम युरोपीय देशांना गॅसपुरवठा केला जात होता. आता ते युक्रेनच्या ताब्यात आले आहे. येथून गॅसपुरवठा रोखला गेला तरी अन्य भागांतून तो केला जाईल, असे सांगण्यात येत आहे.

युक्रेनचे अध्यक्ष झेलन्स्की यांनीसुद्धा खार्किव भागासह अन्य ठिकाणांवरून रशियन सैन्याला हुसकावून लावण्यात येईल, असे सांगितले आहे. या विजयामुळे सैन्याचा आत्मविश्‍वास वाढल्याचा पररराष्ट्रमंत्री दमायत्रो कुलेबा म्हणाले. युद्धापूर्वी जशी परिस्थिती होती तशी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. राजधानी कीव्ह ताब्यात येत नसल्याने रशियाने आपला मोर्चा पूर्वेकडील डोनबास या औद्योगिक भागाकडे वळविला होता. आता लष्करीदृष्ट्या आम्ही अधिक प्रबळ असून डोनबासची लढाई देखील जिंकू, असा आत्मविश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.

गॅसपुरवठा प्रथमच बंद होणार

युक्रेनच्या ताब्यात गॅस केंद्र आल्याने रशियाकडून युरोपीय राष्ट्रांना होणारा गॅसपुरवाठा हा युद्ध सुरू झाल्यानंतर प्रथमच बंद केला जाणार आहे. अगोदरच अमेरिका आणि युरोपने रशियाच्या तेल आणि वायू खरेदीवर बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू होण्यापूर्वी युक्रेनच्या विजयामुळे अशा प्रकारची बंदी घालण्याच्या प्रक्रियेला चालना मिळणार आहे.
बॉम्बहल्‍ले करून शस्त्रपुरवठा रोखण्याची खेळी

कीव्ह : युक्रेनच्या ओडेसा बंदरावर वारंवार हल्‍ले चढवून अमेरिका आणि युरोपीय राष्ट्रांकडून होणारा शस्त्रपुरवठा रोखण्याची खेळी रशियाने रचली आहे. सोमवारी रात्री 7 स्वनातीत क्षेपणास्त्रे टाकण्यात आली होती. त्यात एक ठार आणि पाच जखमी झाले होते. यानंतर पुन्हा हल्‍ले सुरू राहिले आहेत. त्यामुळे युद्ध आणखी तीव्र करण्याची योजना रशिया आखत असल्याचे स्पष्ट होत आहे. गेल्या 24 तासात पोलाद कारखाना आणि परिसरात लढाई विमानातून तुफान बॉम्बफेक करण्यात आली. 24 तसांत 34 हल्‍ले झाले आहेत. हा कारखानाचा संपूर्णत: नष्ट करण्याचा डाव रशियाचा असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

अमेरिका देणार ४० अब्ज डॉलर

वॉशिंग्टन : युक्रेनला ४० अब्ज डॉलरची मदत करण्याच्या विधेयकाला खासदारांनी सभागृहात एकमताने मंजुरी दिली आहे. अध्यक्ष जो बायडेन यांनी अशी मदत जाहीर केली होती. तसेच विधेयक मंजूर करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे युक्रेनला लष्करी आणि आर्थिक मदत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच अन्‍नपुरवठा नियमित होण्यासाठी 5 अब्ज डॉलर देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे युक्रेनला मदत करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी खासदारांचे एकमत झाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा