निखिल कुलकर्णी यांचे प्रतिपादन

पुणे : मानवी उत्क्रांतीची प्रक्रिया प्रचंड मोठी आहे. पृथ्वीतलावर सर्वांत प्रगल्भ मनुष्यच आहे. द्वेष, हाव आणि राग हे मानवाचे शत्रू आहेत. या शत्रूंना थोपवायचे असेल, तर मेंदूत अव्याहत सुरू असलेले विचारांचे चक्र थांबवावे लागेल. हे अनावश्यक विचाराचे चक्र थांबविण्याचा एकमेव उपाय म्हणजे सूर्य नमस्कार आहे, असे प्रतिपादन निखिल कुलकर्णी यांनी केले.

वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित ‘वसंत व्याख्यानमाले’च्या 148 व्या ज्ञानसत्रात ‘सूर्य नमस्कार’ या विषयावर निखील कुलकर्णी यांनी 21 वे पुष्प बुधवारी गुंफले. मनाचे लक्ष केंद्रित करण्याची शक्ती प्राणचक्रातून मिळते. आपल्या शरीरात लहान मोठी अशीे 108 चके्र आहेत. ही चके्र मानवी आयुष्यावर प्रभाव टाकत असतात. ही चक्रे मानवी भाव भावनांची आहेत. आपला मेंदू सतत कार्यरत असतो. त्यातील विचार कमी करण्यासाठी सूर्य नमस्कार मदत करत असतात. शारीरिक व मानसिक आजाराचे मूळही विचार आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणून सूर्य नमस्कार उपयुक्त असल्याचेही कुलकर्णी यांनी नमूद केले.

कुलकर्णी म्हणाले, मन, मनातील विचार, श्‍वास आणि मेंदूशी सूर्य नमस्कारचा जवळचा संबंध आहे. मनातील विचारांप्रमाणे आपल्या श्‍वासाची गती वाढत असते. मन आणि विचार आपल्या शरीरातील प्राणाचा आविष्कार म्हणजे आत्मा हा आपला अविष्कार आहे. शरीराची हलचाल आत्म्याचाच एक भाग आहे. मेंदू हे ऊर्जेचे महाजाल आहे. नकारात्मक विचारांमुळे व्यक्ती निराश होतात. सूर्य नमस्कार मनातील नैराश्य दूर करते. मनातील विचार श्‍वासाची गती बदलतात. त्यातून रक्तातील श्‍वासाची पातळी खालावत असते. सकाळपासून रात्रीपर्यंत मनात कोणता ना कोणता विचार सुरू असतो. त्यावर शरीरातील ऑक्सिजन खर्ची होत असते.

मनातील विचार कमी करण्यासाठी श्‍वासाची मदत होते. सूर्य नमस्कार कधी आणि कोठे करावे याचे तंत्र आहे. सकाळी केलेले सूर्य नमस्कार फलदायी असतात. सूर्य नमस्कारातून आपल्याला मनातील सकारात्मक सूर्य जागा करता येवू शकतो. त्यातून निर्माण होणार्‍या सकारात्मक विचारांमुळे भाषा, धर्म, प्रांताचे भेद गळून पडतील. राग, द्वेषाचे जळमटे नष्ट होतील, असा आशावादही निखिल कुलकर्णी यांनी यावेळी जागविला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा