आयफोन बनवणारी अमेरिकन कंपनी ॲपल या कंपनीचा भाव थोडा कमी झाला आहे. कारण, सौदी अरेबियाची सरकारी तेल कंपनी सौदी अरामकोने तिला मागे टाकत हे स्थान पटकावले आहे. गेले काही दिवस टेक कंपन्यांच्या शेअर्सची मागणी कमी होत असताना, तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे सौदी अरामकोला याचा फायदा झाला आहे. शेअर बाजार बुधवारी बंद झाला तेव्हा, सौदी अरामकोचे बाजारमूल्य २.४२ ट्रिलियन डॉलर होते, तर ॲपलचे २.३७ ट्रिलियन डॉलर होते.

या वर्षाच्या सुरुवातीला ॲपलचे बाजारमूल्य ३ ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचले होते आणि तेव्हा सौदी अरामको ॲपलपेक्षा १ ट्रिलियन डॉलरने मागे होती. पण त्यानंतर ॲपलचे शेअर्स सुमारे २० टक्क्यांनी घसरले आहेत, तर अरामकोचे शेअर्स २८ टक्क्यांनी वाढले आहेत. मात्र ॲपल अजूनही अमेरिकन कंपन्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, तर मायक्रोसॉफ्ट १.९५ ट्रिलियन डॉलर्सच्या बाजारमूल्यासह दुसऱ्या क्रमांकावर आहे. ॲपलची पहिल्या तिमाहीची कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली झाली आहे, परंतु ते म्हणतात की, चीनमधील बऱ्याच शहरांमध्ये कोविड-19 लॉकडाउन आणि पुरवठा साखळीतील अडचणींमुळे जून तिमाहीतील कामगिरीवर परिणाम होऊ शकतो.

नफ्यात १२४ टक्के वाढ

दुसरीकडे, सौदी आरामकोच्या निव्वळ नफ्यात गेल्या वर्षी तब्बल १२४ टक्के वाढ झाली. २०२० मध्ये ते ४९ अब्ज डॉलर होते. तर २०२१ मध्ये ते ११० अब्ज डॉलर होते. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. महागाई वाढल्याने तेलाचा वापर कमी होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा