पुणे : नैऋत्य मोसमी वार्‍यांच्या (मान्सून) आगमनासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नियोजित वेळेआधीच म्हणजेच 13 ते 19 मे दरम्यान मान्सून अंदमानात धडकणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने गुरूवारी वर्तविला. पण, त्याचवेळी मान्सूनच्या आगमनाआधीच अंदमानात पावसाला सुरूवात होणार असल्याचे संकेतही हवामान विभागाने दिले आहेत.
दरवर्षी सुमारे 22 मे च्या आसपास मान्सून अंदमानमध्ये दाखल होतो. यंदा 13 ते 19 मे दरम्यान म्हणजेच वेळेआधी मान्सून हजेरी लावणार आहे. केरळमध्ये 20 ते 26 मे पर्यंत मान्सूनचा पाऊस दाखल होईल, तर तळकोकणात 27 मे ते 2 जूनपर्यंत मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
राज्यातही वारंवार हवामानात बदल होत आहेत. सध्या असनी चक्रीवादळामुळे राज्यावर अवकाळी पावसाचे संकट आहे. पुढील तीन आठवड्यांचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. यंदा मान्सूनला लवकरच सुरुवात होणार असल्याने शेतकर्‍यांना शेतीची उर्वरित कामे लवकर पूर्ण करावी लागणार आहेत.
मान्सूनच्या आगमनानंतर अरबी समुद्रावर दुसर्‍या आठवड्यात पाऊस सुरू होईल आणि त्यानंतर भारतात पुढील आठवड्यात मान्सून दाखल होईल, अशी माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करून जाहीर केली आहे. असनी चक्रीवादळामुळे हवामान विभागाने आंध्रप्रदेशातील तीन जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या भागांत होणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. चक्रीवादळामुळे राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात ढगाळ वातावरण असणार आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली तसेच कर्नाटक, केरळमध्ये ढगाळ वातावरणाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात वादळी
वार्‍यासह पाऊस

बदलत्या वातावरणाचा परिणाम म्हणून आज सोलापूर, उस्मानाबाद, सांगली, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली आदी ठिकाणी वादळी वारे आणि वीजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. कोकणात तुरळ ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात मात्र पावसासह काही भागात उष्णतेची लाटही कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा