पुणे : सातत्याने बदलणारे वातावरण आणि पावसाच्या भितीने कोकणातील शेतकरी अधिक प्रमाणात हापूस विक्रीला पाठवत आहेत. बाजारात आवक वाढल्याने डझनाच्या दरात मोठी घट झाली आहे. हापूस स्वस्त झाला असून तो सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला आहे. तयार मालाच्या 5 ते 9 डझनाच्या पेटीला घाऊक बाजारात 1500 ते 3000 दर मिळत आहे. हेच दर टिकून राहणार असल्याचा अंदाज आहे.
यंदा कोकणातील हापूसला बदलत्या हवामानाचा फटका बसला होता. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत झाडांवर 30 ते 40 टक्केच फळे होते. त्यामुळे सुमारे महिनाभर उशीराने हापूसची बाजारात आवक सुरू झाली. प्रारंभीच्या काळात बाजारात आवक कमी असल्याने दर अधिक होते. मात्र आता बाजारातील आवक वाढली आहे. मार्केटयार्डातील फळ बाजारात रोज 1.5 ते 2 हजार पेट्यांची आवक होत आहे. त्यामुळे दरही घटले आहेत. सद्य:स्थितीत घाऊक आणि किरकोळ बाजारातील दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत.
मागील आठवडाभर बहुतांश राज्यात उष्णतेची लाट होती. उकाडा वाढला होता. त्यामुळे झाडांवरील आंबे काढण्याचे प्रमाणात वाढ झाली. मात्र आता हवामानात बदल झाला आहे. ढगाळ व पावसाळी वातावरण बनले आहे. त्याचाच परिणाम म्हणून शेतकरी झांडावरील फळे अधिक प्रमाणात तोडून विक्रीसाठी बाजारात पाठवत आहेत. त्यामुळे बाजारातील आवकही वाढली आहे. दरही घटले आहेत. मात्र बदलत्या वातावरणाचा परिणाम म्हणून ग्राहक हापूसची खरेदी कमीच प्रमाणात करत असल्याचे चित्र बाजारात असल्याचे पाडण्यास मिळत आहे.
सद्य:स्थितीत बाजारात दाखल होत असलेला हापूस अत्यंत चांगल्या प्रतीचा आहे. त्यामुळे पेटील खराब होणार्‍या फळाचे प्रमाण अत्याल्प आहे. बाजारात दाखल झालेले फळ आकाराने मोठे आहे. त्यामुळे हापूस खाण्याची ही योग्य वेळ आहे. विशेष म्हणजे दर आवाक्यात असल्याने सर्वसामान्यांनाही मनसोक्त हापूसची चव चाखता येणार आहे. पावसाला सुरूवात झाल्यास बाजारातील आवक आणखी वाढणार आहे. तसे झाल्यास दरात आणखी घट होऊ शकते. असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
खरेदी मंदावली
वातावरणात सातत्याने बदल होत आहे. ढगाळ वातावरण आणि पावसाच्या भितीन कोकणातील शेतकरी अधिकचा माल बाजारात पाठवत आहेत. मात्र त्या तुलनेत ग्राहकांकडून खरेदी होत नसल्याचे चित्र आहे. ग्राहकांकडून खरेदी मंदावली आहे. बाजारात उपलब्ध असलेला हापूस चांगल्या प्रतिचा आहे. दरही सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत. हापूसची चव चाखण्याची ग्राहकांसाठी ही संधी आहे. – अरविंद मोरे, व्यापारी, मार्केटयार्ड.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा