जनहित अर्ज या व्यवस्थेचा दुरुपयोग करु नको असे म्हणत अर्जांकर्त्यांना फटकारले

अलाहबाद : ताज महाल प्रकरणी उच्च न्यायालयाने भाजप नेते रजनीश सिंह यांना चांगला धक्का दिला आहे. रजनीश सिंह यांची ताजमहालच्या २२ खोल्या उघडण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली.

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात भाजपचे प्रवक्ते रजनीश सिंह यांनी ताजमहालमध्ये असलेल्या २२ खोल्या उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारा अर्ज दाखल केला होता. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाला ताजमहालच्या आत २२ खोल्या उघडण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून तेथे हिंदू शिल्प आणि शिलालेख लपलेले आहेत की नाही हे समजेल. असा दावा अर्जात केला होता. या प्रकरणी आज अलाहबादच्या उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने ही मागणी फेटाळली.

या अर्जात दोन मागण्या करण्यात आल्या आहेत. एक म्हणजे ताज महालमधील इतिहासा संबंधित आहे. तर, दुसरी ताजमहालमधील बंद खोल्यांबाबत आहे. आमच्या मते अर्ज कर्त्यांनी आम्हाला पूर्णपणे न्यायसंगत मुद्द्यावर निर्णय देण्यास प्रवृत्त केले, असे ही न्यायालयाने नमूद केले.

अर्ज कर्त्यांनी केलेल्या सत्यशोधन समितीची मागणीचाही न्यायालयाने समाचार घेतला आहे. या समितीच्या माध्यमातून तुम्हाला नेमके काय जाणून घ्यायचे ? असा प्रश्न न्यायालयाने केला. तसेच, अर्ज ही योग्य आणि न्यायिक मुद्द्यांवर आधारित नाही, अशी टिप्पणी न्यायालयाने केली आहे. ताजमहालमधील २२ खोल्या उघडण्यासाठी व सत्य शोधण्यासाठी तुम्ही एका समितीची नेमणूक करण्याची मागणी करत आहात. अशी मागणी करणारे तुम्ही कोण? हा तुमचा अधिकार नाहीये. तुम्हाला उत्तर हवे असेल तर तुम्ही माहिती आधिकारातून जाणून घेऊ शकता, असे ही न्यायालयाने म्हटले.

अर्ज खंडपीठाच्या पटलावर आल्यानंतर न्यायालयाने अर्जांकर्त्यांना खडे बोल सुनावले होते. जनहित अर्जाच्या व्यवस्थेचा दुरुपयोग न करता आधी ताजमहाल कोणी बांधला याचा अभ्यास करा, विद्यापीठात जाऊन पीएचडी करा आणि मग न्यायालयात या,असा सल्ला दिला होता. तसेच, जनहित अर्ज या व्यवस्थेचा दुरुपयोग करु नको, उद्या तुम्ही येऊन न्यायाधीशांच्या कक्षेत जाण्याची परवानगी मागाल. असे कसे चालेल?, असा प्रश्न न्यायालयाने केला. तुम्हाला ज्या विषयाबाबत काही माहिती नाही त्याचा अभ्यास करा. जर तुम्हाला कोणी अभ्यास किंवा संशोधन करण्यापासून रोखलं तेव्हा कोर्टाकडे न्याय मागू शकता, अशा कठोर शब्दांत न्यायालयाने अर्ज कर्त्यांना सुनावले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा