पुणे : एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. एसटीच्या 74 व्या वर्धापनदिनी म्हणजेच 1 जूनपासून पुणे-नगर मार्गावर इलेक्ट्रिक बस धावणार आहे. पुण्यासह लवकरच राज्यभरात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या इलेक्ट्रिक बस धावण्यास सुरुवात होणार आहे. या बसला ‘शिवाई’ असे नाव देण्यात आले आहे.
शिवाई नावाच्या या इलेक्ट्रिक बस राज्यभरात टप्प्याटप्प्याने सुरू केल्या जातील. पहिल्या टप्प्यात म्हणजेच जून-जुलैपर्यंत एसटीच्या ताफ्यात 150 ई-बस दाखल होणार आहेत. केंद्र सरकारच्या फास्टर अ‍ॅडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायब्रीड अँड इलेक्ट्रिक व्हेइकल्स योजनेअंतर्गत टप्प्याटप्प्याने एक हजार इलेक्ट्रिक बस आणि दोन हजार बस मिळवणार आहेत. 1 जून 1948 रोजी पुणे ते नगर अशी पहिली बस धावली. म्हणून 1 जून हा एसटीचा स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो. सद्य:स्थितीत राज्यभरात एसटीचे जाळे पसरले आहे. सध्या महाराष्ट्रातील 248 डेपोमध्ये जवळपास एक लाख कर्मचारी कार्यरत आहेत.
पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. डिझेलच्या किंमती आवाक्याबाहेर गेल्याने एसटीचा डिझेलचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. डिझेलप्रमाणे एसटीचा इतर खर्चही वाढला असल्याने इलेक्ट्रिक बसमुळे एसटीच्या खर्चाला काही अंशी आळश बसणार आहे. त्यामुळे राज्यातील अनेक मार्गावर इलेक्ट्रिक बस चालविण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. 1 जून पासून इलेक्ट्रिक बसच्या वापराला प्रत्यक्षात सुरूवात होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा