इस्लामाबाद : पाकिस्तान आणि चीन यांच्यातील तणाव आता समोर येत आहे. पाकिस्तान देखील श्रीलंकेसारखे आर्थिक संकटात आले. चीनच्या कंपन्यांनी पाकिस्तान सरकारने ३०० अब्ज रुपयांची थकबाकी दिली नाही तर वीज पुरवठा बंद करण्याचा इशारा दिला आहे. इमरान खान यांच्या सरकारच्या काळात पाकिस्तानवरील कर्ज वाढला आहे. पाकिस्तानवरील एकूण कर्जापैकी २० टक्के कर्ज चीनचे आहे.

चीनच्या दोन डझनहून अधिक कंपन्या पाकिस्तानमध्ये काम करत आहेत. पाकिस्तान सरकारने ३०० अब्ज रुपयांची थकबाकी न दिल्यास आम्हाला वीज प्रकल्प बंद करावे लागतील, असे म्हटले आहे. जोपर्यंत आमची थकबाकी दिली जात नाही तोपर्यंत आम्ही वीज प्रकल्प सुरु करणार नाही, असा इशारा वीज कंपन्यांनी दिला आहे. चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर अंतर्गत ३० चिनी कंपन्यांनी पाकिस्तानात व्यवसाय सुरु केला आहे.

रेल्वे, ऊर्जा आणि दळवळण क्षेत्रात चीनच्या कंपन्यांनी प्रवेश केला आहे. पाकिस्तानचे योजना आणि विकास मंत्री एहसान इकबाल यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या बैठकीत कंपन्यांनी स्पष्टपणे पाक सरकारला धमकी दिली. या शिवाय वीज कंपन्यांनी पाकिस्तानच्या मंत्र्यांसमोर वीज प्रक्रिया आणि टॅक्स संदर्भातील अडचणी मांडल्या.

पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी उन्हाळ्यातील वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त वीज पुरवठ्याची मागणी केली होती. मात्र, कंपन्यांनी थकबाकीच्या रकमेचा मुद्दा उपस्थित करत याला नकार दिला. कंपन्यांनी इंधनांच्या वाढत्या कंपन्या, कोळश्याचे वाढलेले दर याचा दाखला देत वीज पुरवठ्यासाठी आगाऊ रक्कम देण्याची मागणी केली. कोळसा उत्पादकांनी कोळशाचा साठा कमी असल्याचे सांगत उत्पादन वाढवल्यास, उपलब्ध कोळसा देखील संपून जाईल, असे म्हटले.

कराचा दर जास्त असल्याने कंपन्या नाराज

चीनच्या कंपन्यांनी थकबाकी दिली नसल्याचे सांगितले. कोरोना साथीमुळे आर्थिकदृष्ट्या संकट आले असून जादा कर असल्याने नवी संकट आल्याचे वीज कंपन्यांची अधिकाऱ्यांनी म्हटले. पाकिस्तानच्या मत्र्यांनी शाहबाज शरीफ यांची दखल घेतली असून वीज कंपन्यांची थकित रक्कम दिली जाईल, असे म्हटले.

पाकिस्तानचा रुपया नीचांकी

पाकिस्तान रुपयाचे मूल्य डॉलर्सच्या तुलनेत आत्तापर्यंतच्या सर्वात खालच्या स्तरावर येऊन पोहचले आहे. एका डॉलर्ससाठी पाकिस्तानला १८८.३५ रुपये मोजावे लागत आहेत. श्रीलंकेप्रमाणे पाकिस्तानच्या चलनाचे मूल्य डॉलर्सच्या समोर मोठ्या प्रमाणात घसरले आहे. आज सकाळी ८२ पैशांनी पाकिस्तान रुपया डॉलर्सच्या तुलनेत घसरला.

पाकिस्तानमधील अस्थिर राजकीय परिस्थिती, ढासळलेली अर्थव्यवस्था, महागाई, इंधनाच्या वाढत्या किंमती यामुळे पाकिस्तानचे कंबरडे मोडले आहे. असे असून पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे मदत मागितली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही ६ अब्ज डॉलर्स देण्याची तयरी दर्शवली होती. यासाठी काही प्रमाणात आर्थिक शिस्त पाळण्याच्या सूचना या पाकिस्तानला केल्या होत्या. विशेषतः इंधन आणि वीजेवर असलेली सवलत मोठ्या प्रमाणात कमी कराव्यात असे नाणेनिधीने स्पष्टपणे पाकिस्तानला सांगितले होते. दरम्यान पाकिस्तामध्ये सत्तांतर झाल्यावरही हे बदल होऊ शकले नाहीत. यामुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही पाकिस्तानला अपेक्षित असलेला अर्थपुरवठा थांबवला. यामुळे पाकिस्तानच्या अडचणीत भर पडली आहे.

विदेशी चलन साठाही पाकिस्तानमधील कमी झाला असून पुढील काही दिवस काढता येतील अशी परिस्थिती आहे. त्यात आता अन्नधान्याचे संकटही पाकिस्तानसमोर येऊन ठेपले आहे. गहूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात यावर्षी कमी झाल्याने आणखी एक अडचणीचा डोंगर पाकिस्तानसमोर उभा राहीला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा