पं. शिवकुमार शर्मा हे संगीत क्षेत्रातील हिमालयासमान व्यक्तिमत्त्व होते. संतूर या वाद्याला त्यांनी प्रस्थापित केले आणि प्रतिष्ठा मिळवून दिली. तपश्‍चर्येच्या जोरावर त्यांनी जगभरात हे वाद्य पोहोचवले. त्यांचे व्यक्तिमत्त्व ऋषितुल्य होते. कलाकार म्हणून ते समृद्ध होते. वाद्यांवर प्रेम करणारे ते भीष्माचार्य होते. त्यांच्या जाण्याने रसिक, श्रोत्यांना जेवढे दु:ख झाले आहे. तितकेच दु:ख संतूर वाद्याला झाले असावे. अशा शब्दांत ज्येष्ठांनी पं. शिवकुमार शर्मा यांना श्रद्धांजली वाहिली…

संतूर वाद्याला प्रतिष्ठा मिळवून दिली

पं. शिवकुमार शर्मा यांचे संगीत क्षेत्रात मोठे योगदान आहे. संतूर वाद्य त्यांच्यामुळे विकसित झाले. त्यांचा शिष्य म्हणून त्यांच्याकडे मला शिक्षण घेता आले, हे मी माझे भाग्यच समजतो. त्यांनी दिलेल्या शिकवणीच्या मार्गावरून माझी संगीत क्षेत्रात वाटचाल सुरू आहे. ते गुरू म्हणून तसेच माणूस म्हणूनही आदर्शवत आहेत. शिष्यासोबत त्यांचे मैत्रीचे आणि जिव्हाळ्याचे ऋणानुबंध असायचे.

संतूर वाद्य आणि या वाद्याची शैली कोणताच आराखडा नव्हता. वाद्याबाबत फारसे संदर्भही उपलब्ध नव्हते. या वाद्याचा मार्गही उपलब्ध नव्हता, अशा कठीण परिस्थितीत प्रचंड अभ्यास करून पं. शिवकुमार शर्मा यांनी संतुर वाद्य विकसित केले. त्यास लोकप्रियता मिळवून दिली. पं. शिवकुमार यांच्यामुळे संतुर वाद्य देशाला परिचित झाले. या वाद्याचा विकास आणि संगीत क्षेत्रातील योगदानाचे संपूर्ण श्रेय पं. शिवकुमार शर्मा यांना आहे.

पं. शिवकुमार यांचे व्यक्तिमत्त्व दैवी होते. स्वभाव अतिशय मृदु होता. शिष्यांवर ते कधीच रागवत नसत. मुळात त्यांना कधी आम्ही रागावलेले पाहिलेच नाही. त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येक व्यक्तीवर ते जिवापाड प्रेम करत. संगीतावर त्यांचे नितांत प्रेम. त्यामुळे संगीत प्रेमी अथवा संगीताचे जाणकार असणारा प्रत्येकजण त्यांना आपलासा वाटत असे. इतके मोठे संतूर वादक असूनही त्याचा मोठेपणा त्यांनी मिरवला नाही. या स्वभावामुळेच ते लोकप्रिय ठरले. त्यांनी संतूर वादनात अनेक शिष्य घडविले. त्यांचे शिष्य देश आणि विदेशातही कार्यरत आहेत. त्यांनी शिष्यांना केलेल्या मार्गदर्शनातून आणि संतूर वादनातून त्यांच्या आठवणी कायम आमच्या सोबत असतील. पं. शिवकुमार शर्मा यांच्या जाण्याने संगीत क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली…

ऋषितुल्य व्यक्‍तिमत्त्व

संतूर म्हणजे पं. शिवकुमार शर्मा आणि या वाद्याचे विकसकही पं. शिवकुमार शर्माच. अशा महान व्यक्तिमत्त्वाच्या मार्गदर्शनानुसार त्यांच्याच सानिध्यात संतूर वाद्याचे शिक्षण घेता आले, हे मी माझे भाग्य समजतो. ते नुसतेच गुरू नव्हते, तर समाजात वागावे कसे? बोलावे कसे? समाजाचा घटक म्हणून राहणीमान कसे असावे? याचे शिक्षणही त्यांच्याकडून मिळाले. त्यामुळे माझ्या आयुष्यावर पं. शिवकुमार शर्मा यांच्या व्यक्तिमत्त्वाचा मोठा प्रभाव आहे. ते गुरू म्हणून वडिलांच्या स्थानी होते. त्यांच्या जाण्याने न भरून निघणारे नुकसान झाले आहे.

1981 मध्ये पं. शिवकुमार शर्मा यांच्याकडे संतूर वाद्याचे शिक्षण घेण्यास सुरूवात केली. मी त्यांच्याकडे गुरूकुल पद्धतीने शिक्षण घेतले. एखाद्या शिष्याला एखादा राग समजला नसला, तरी ते चार ते पाच वर्ष एकच राग वेगवेगळ्या पद्धतीने शिकवत. त्या रागाच्या सर्व बाजू समजावून सांगत. राग आणि वाद्याचे नाते समजावून देत. जोपर्यंत आपण वाद्याशी एकरूप होत नाही, तोपर्यंत वाद्याच्या खुबी कळत नाहीत. त्यामुळे वादक आणि वाद्य हे एकरूपच असले पाहिजे. ही शिकवणही पं. शिवकुमार यांनी आम्हाला दिली. वादन क्षेत्रातही भविष्य घडविता येते, ही हिंमत आणि विश्‍वासही त्यांनी आम्हाला दिला.

मी आयुर्वेदाचे शिक्षण घेऊन वैद्यकीय क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पं. शिवकुमार यांनी मला बोलावून घेतले. संतूर वाद्य शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. या वाद्याचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांच्यामुळेच मी वैद्यकीय क्षेत्र सोडून संगीत क्षेत्रात आलो. त्यांच्यासोबत अनेक कार्यक्रम करण्याची संधी मिळाली. विशेषत: त्यांच्या शिष्य असतानाही एकाच व्यासपीठावर त्यांच्यासोबत साथसंगत करण्याची संधी अनेक वेळा मिळाली. गुरू म्हणून जे काही द्यायचे होते ते सर्व पं. शिवकुमार यांनी आम्हाला दिले. त्यांच्या जाण्याने आम्ही गुरूला मुकलो आहोत.

लय, तालाचा उपासक

एखाद्या नव्या वाद्याला विकसित करून त्याला नवी ओळख देणे, वाद्यांच्या यादीत समावेश करून घेणे आणि विशेष म्हणजे, त्या वाद्याचे देशभरात चाहते निर्माण करणे हे काम सोपे नाही. मात्र हे कठीण काम पं. शिवकुमार शर्मा यांनी केले. संतूर या वाद्याला लोकप्रियतेच्या शिखरावर नेण्याचे काम त्यांनी केले. संतूर या वाद्याला असणार्‍या मर्यादा त्यांनी ओळखल्या होत्या. त्या मर्यादा ओलांडून पुढे जाण्याचा विक्रमही त्यांनी केला. कार्यक्रमात या वाद्याच्या मर्यादा कधीच श्रोत्यांच्या लक्षात येऊ दिल्या नाहीत. त्यामुळे वाद्य आणि संगीत क्षेत्रात त्यांचे योगदान मोलाचे आणि न विसरण्यासारखे आहे.

रागाची ते सुंदर मांडणी करत. रागात शुद्धता ठेवून वाद्याची मधुरता श्रोत्यांपर्यंत पोहचवत असत. संतूर हे लय आणि तालाचे वाद्य तरी या वाद्यात स्वर निर्माण करण्याचे मौलिक कार्य पं. शिवकुमार शर्मा यांनी केले. त्यांना वाद्यातील तीनही सिद्धी पारंगत होत्या. त्यामुळे त्यांच्या सोबत वादनाला बसताना तबला वादकाला मोठे आव्हान असायचे. वाद्याविषयी त्यांचा प्रचंड अभ्यास होता. वाद्यावर संपूर्ण नियंत्रण होते. त्यांनी नेहमीच वाद्याचा सेवक बनून रंजक व प्रबोधनात्मक वादन केले. त्यांनी वाद्याचा कधी ‘शो’ केला नाही.

जाहीर कार्यक्रमांसह त्यांनी चित्रपट आणि संगीत क्षेत्रातही आपल्या वाद्याचा ठसा उमटविला. त्यामुळे संगीत क्षेत्रातील पं. शिवकुमार शर्मा यांचे योगदान न विसरण्याजोगे आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व लोकप्रिय होते. त्यांचा सहवास ऊर्जावर्धक असायचा. त्यांनी अनेक शिष्य घडविले. त्यांचे शिष्य वादनाच्या माध्यमातून त्यांचा संतूर वादनाचा वारसा पुढे चालविणार आहेत. देश आज एका चांगल्या आणि प्रभावी वादकाला मुकला आहे.

शास्त्रीय संगीतात संतूरला स्थान पं. शिवकुमार शर्मा यांना मी प्रथम 1974 मध्ये सोलापूर येथील एका कार्यक्रमात ऐकले होते. मी सवाई गंधर्व महोत्सवात वादन करत होतो. माझे तबला वादन शिवकुमार शर्मा यांना आवडले. म्हणून त्यांनी मला बोलावून घेतले. संवाद साधून अनेकवेळा सहवादनाची संधी दिली. सर्वांना सामावून घेणारा त्यांचा स्वभाव होता. अनेक वर्षे त्यांचा मला सहवास लाभला. त्यांच्या जाण्याने धक्का बसला आहे.

एकदा पं. वसंतराव देशपांडे यांच्यासोबत अमेरिका दौर्‍यावर असताना त्याच वेळी पं. हरिप्रसाद चौरसिया आणि पं. शिवकुमार शर्माही अमेरिकेत होते. त्यांच्या एका कार्यक्रमात जो तबला वादक होता. तो आलाच नाही. त्यामुळे त्यांनी पं. वसंतराव देशपांडे यांना संपर्क केला. त्यांनी माझा शिष्य तुमच्यासोबत सहवादन करेल, असे सांगितले. पं. शिवकुमार शर्मा यांच्या सोबत वादन करायचे हे समजताच मला आश्‍चर्याचा धक्का बसला. त्या कार्यक्रमात त्यांच्या सोबत सहवादन केले. माझ्या वादनावर ते प्रभावित झाले. त्यांनीं फोन करून मला मुंबईत बोलावून घेतले. त्यांच्या अनेक कार्यक्रमांत मी सहवादन केले. त्यांच्याच मार्गदर्शनुसार मी मुंबईत अनेक वर्षे थांबलो.

मुळात संतूर वादनाला शास्त्रीय संगीतात स्थान नव्हते. पं. शिवकुमार शर्मा यांनी संतूर या वाद्याला शास्त्रीय संगीतात स्थान मिळवून दिले. प्रारंभीच्या काळी संतूर या वाद्याची चेष्टा केली जात होती. मात्र या वाद्यात योग्य ते बदल केले. अभ्यास करून या वाद्यात मधुरता आणली. संतूर या वाद्याला लोकप्रियता मिळवून देण्याचे शिवधनुष्य पं. शिवकुमार शर्मा यांनी पेलले. संतूर वाद्याचा विकास करणे, त्यास लोकप्रियता मिळवून देण्याचे संपूर्ण श्रेय पं. शिवकुमार शर्मा यांचे आहे. संतूर या वाद्याचे जनकच पं. शिवकुमार शर्मा आहेत. त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.

वाद्यात स्वर, रागासह मधुर लयीचा विचार

पं. शिवकुमार शर्मा आणि माझी घनिष्ठ मैत्री होती. 1994 पासून देश आणि विदेशात सुमारे 250 ते 300 कार्यक्रम एकत्र केले आहेत. त्यामुळे वादनाच्या पुढचे आमचे नाते होते. त्यांच्या जाण्याने अतीव दु:ख झाले आहे. शास्त्रीय संगीतातील त्यांचे योगदान कोणालाही विसरता येणार नाही. शास्त्रीय संगीताची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे.

संतूर वाद्य हे काश्मीरमधील लोकप्रिय वाद्य होते. या वाद्याला नव्याने जन्म देऊन पं. शिवकुमार शर्मा यांनी या वाद्याची विशिष्ट शैली निर्माण केली. त्यात योग्य ते बदल करून त्या वाद्यात उच्च दर्जाचा विकास केला. त्यात लयकारी निर्माण केली. त्यामुळे संतूर हे वाद्य अधिक प्रभावीपणे श्रोत्यांसमोर आले. या वाद्याने श्रोत्यांच्या मनावर गारुड घातले. संतूर हे वाद्य शास्त्रीय वाद्यात नव्हते. मात्र पं. शिवकुमार शर्मा यांनी या वाद्यात स्वर, रागासह लयीचा विचार केला. वाद्य आणि वाद्याच्या विकासाबाबत संशोधन केले. या वाद्याचा प्रचार आणि प्रसारही केला. ते स्वभावाने अत्यंत शांत आणि संयमी होते. त्यांच्या दृष्टिकोनात प्रेम होते. जुगलबंदी, सवाल-जवाब याला प्राधान्य न देता जे काही श्रेय आहे, ते व्यासपीठावरील सर्वांचेच आहे, असे ते मानत असत. कोणत्याच गोष्टीचे त्यांनी कधी श्रेय घेतले नाही. वाद्य आणि संगीतावर त्यांची प्रचंड निष्ठा होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा