पाश्चिमात्य राष्ट्रांमुळेच युक्रेनवर हल्ला : पुतीन
मॉस्को : रशिया सोमवारी दुसर्या महायुद्धातील जर्मनीच्या पराभवाचा विजय दिवस एकीकडे साजरा करत असताना दुसरीकडे हा दिवस युक्रेनसाठी घातक ठरतोय की काय ?, अशी भिती व्यक्त होत आहे. कारण रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अधिक आक्रमक भूमिका घेतली तर रशियाचा विजय दिवस युक्रेनसाठी काळरात्र ठरणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, विजय दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात पुतीन यांनी युक्रेनवरील हल्ला हा पाश्चिमात्य राष्ट्रांनी केलेल्या राजकारणामुळे करावा लागल्याचे म्हटले आहे.
लष्करीदृष्ट्या महत्वाचे मानले जात असलेले युक्रेनच्या दक्षिणेकडील शहर मारियुपोल विजय दिवसानिमित्त काबीज करण्याचा त्यांचा मनोदय आहे. शहरातील पोलाद कारखाना ताब्यात घेण्यासाठी रशियन सैन्य तेथील 2 हजार युक्रेनच्या सैन्याशी लढा देणार आहे. हा कारखाना ताब्यात आला की रशियाचा मारियुपोलवर पूर्ण कब्जा होईल, असे मानले जात असून क्रिमियाला जाण्याचा मार्गदेखील या शहरातून जातो.
आता रशियाकडून क्षेपणास्त्र हल्ले अधिक तीव्र केले जातील, असा इशारा युक्रेनच्या अधिकार्यांनी आणि अध्यक्ष झेलन्स्की यांनी देखील दिला आहे. झापोरिझ्झीया येथील नागरिकांकडून रशियन सैनिक महत्वाची कागदपत्रे जप्त करत असून विजय दिवसाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करत आहेत.
विजय दिवसानिमित्त मॉस्को येथील लाल चौकात होणार्या संचालन सोहळ्यात युक्रेनवर आणखी जोरदार हल्ले चढवा, असे आदेश पुतीन आपल्या सैन्याला देतील, अशी भिती झेलन्स्की यांनी व्यक्त केली.
कसला विजय दिवस आणि कसले काय?
संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या दूत लिंडा थॉमस ग्रिनफिल्ड यांनी रशियावर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, कसला विजय दिवस आणि कसले काय? ते युक्रेनचा पराभव करू शकत नाहीत. ते जगाला आणि नाटाचे तुकडे करू शकत नाहीत. उलट रशिया आता जगात एकाकी पडत चालला आहे. एकाच वेळी अनेक आघाड्यावर रशियाने युद्ध सुरू केले आहे. आता मारियुपोल त्यांच्या विजयाच्या टप्प्यात आले आहे.
रशियाकडून आमच्यावर बॉम्बहल्ले सुरूच आहेत, असे पोलाद कारखान्याच्या संरक्षणात असलेले कॅप्टन स्वेतोस्लाव्ह पलमार यांनी सांगितले. सुमारे 100 सैनिक जखमी झाले आहेत, असे एका अधिकार्याने सांगितले. तसेच आम्ही शरणागती पत्करणार नाही. या उलट शत्रूला धूळ चारल्याशिवाय राहणार नाही, असेही तो म्हणाला.
शाळेवरील बॉम्बहल्ल्यात ६० ठार
दरम्यान, युक्रेनमधील शाळेवर केलेल्या हल्ल्यात 60 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी रशियाने बिलोव्हॉरव्हीका गावातील एका शाळेवर बॉम्बहल्ले केले होते. या घटनेचा तीव्र निषेध संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अॅटोनी गुटारीस यांनी केला आहे.
लाल चौकात पुतीन यांचे जोरदार भाषण
रशियाच्या जर्मनीवरील विजयानिमित्त मॉस्कोतील लाल चौकात अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवरील हल्ल्याचे समर्थन केले. पाश्चिमात्य राष्ट्रांच्या राजकारणामुळे युक्रेनवर हल्ला करावा लागल्याचे त्यांनी सांगितले. युक्रेनवर केलेला हा हल्ला पूर्वनियोेजित आणि योग्य वेळी केला. त्या हल्ल्याची गरज होती. कारण रशियाच्या सीमेला धोका निर्माण झाला होता. सीमेवरील हा धोका परतवून लावण्यासाठी एका सार्वभौम अणि स्वतंत्र राष्ट्राला जे काही करायला पाहिजे ते रशियाने केले आहे. पाश्चिमात्य राष्ट्रांच्या विशेषत: नाटो संघटनेच्या विस्तारवादी धोरणावर त्यांनी जोरदार टीका केली. या धोरणामुळे युक्रेनवर हल्ला करणे भाग पडल्याचे ते म्हणाले. फौजा या देशासाठी लढत आहेत. या वेळीं त्यांनी 2014 मध्ये युक्रेन युद्धात भाग घेतलेल्या सैनिकांनी संचलनामध्ये भाग घेतल्याचे आवर्जून सांगितले.
युद्धभूमीतील घडामोडी
युक्रेनच्या शाळेतील बॉम्बहल्ल्यात 60 जण ठार
उपग्रहाने टिपली शाळेवरील हल्ल्याची छायाचित्रे
हल्ला होण्यापूर्वी 30 जण बाहेर पडल्याने वाचले
जी 7 राष्ट्रांनी रशियाच्या खनिज
तेलावर बंदी घातली किंवा त्यात कपात करण्याचा निर्णय जाहीर केला.