मंत्र्यांच्या निवासस्थानी जाळपोळ

कोलंबो : अभूतपूर्व आर्थिक संकट आणि राजकीय अस्थैर्याला सामोरे जाणाऱ्या श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदूा राजपक्षे यांनी अखेर सोमवारी राजीनामा दिला़ महिंदा यांच्या समर्थकांनी सरकारविरोधी निदर्शकांवर केलेल्या हल्ल्यानंतर हिंसाचार उसळल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पंतप्रधानपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली. या हिंसाचारात सत्ताधारी खासदाराचा मृत्यू झाला असून, जवळपास १३० जण जखमी झाले आहे. यामुळे देशभर संचारबंदी लागू करण्यात आली.

अध्यक्ष गोताबया आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी राजीनामे द्यावेत, या मागणीसाठी ९ एप्रिलपासून देशभर हिंसक निदर्शने होत आहेत. देशात औषधे, इंधन आणि विजेचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे राजपक्षे सरकारविरुद्ध तीव्र रोष आहे. मात्र अध्यक्ष आणि पंतप्रधान राजपक्षे बंधूंनी राजीनामा देण्याचे टाळले होते. या दोघांनीही जनतेला संयम राखण्याचे आवाहन केले होते. मात्र म्याना गो गामा आणि गोता गो गामा या भागांत सोमवारी सरकार समर्थक आणि सरकारविरोधी निदर्शकांमध्ये हिंसाचार उसळला. त्यात १३० जण जखमी झाले. त्यानंतर येथे लष्कर तैनात करण्यात आले आहे. निदर्शकांना रोखण्यासाठी पोलिसांनी मानवी साखळी केली होती.

या हिंसाचारानंतर अखेर महिंदा राजपक्षे यांनी राजीनाम्याची घोषणा केली. त्यांनी राजीनामा पत्र अध्यक्ष गोताबया यांच्याकडे दिले. सर्वपक्षीय हंगामी सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आल्याचे राजपक्षे यांनी म्हटले आहे.

अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांनी निदर्शकांना शांततेचे आवाहन केले.हिंसाचाराने हिंसाचारच वाढतो, तोडगा निघत नाही. आर्थिक संकटावर आर्थिक तोडगा काढणे गरजेचे आहे. सरकार हा तोडगा काढण्यासाठी कटिबद्ध आहे व त्या दिशेने सातत्याने प्रयत्न करत आहे. हिंसाचाराचा तीव्र निषेध करून कोणत्याही राजकीय विचारधारेचे असले तरी कुणीही हिंसाचाराला प्रोत्साहन देऊ नये अथवा तो करू नये. आपण सर्व जण एकत्र येऊन हा प्रश्न सोडवू, असे आवाहन अध्यक्ष राजपक्षे यांनी ट्वीटद्वारे केले.

श्रीलंकेतील अभूतपूर्व आर्थिक संकटावर मात करण्यासाठी हंगामी सरकार स्थापन करण्यासाठी अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांच्यावर दबाव वाढला आहे. राजपक्षे यांनी सत्तात्याग करावा, यासाठी निदर्शने होत आहेत. त्यातूनच हा हिंसाचार उद्भवला.

१९४८ला स्वतंत्र झाल्यापासून श्रीलंकेत प्रथमच एवढे मोठे आर्थिक संकट उद्भवले आहे. परकीय गंगाजळीच्या खडखडाटामुळे श्रीलंकेला अत्यावश्यक अन्नधान्य, इंधन आयात करणे परवडत नाही. त्यामुळे त्यांची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, दर गगनाला भिडले आहेत.

‘हंगामी सरकार स्थापनेसाठी पाऊल’

महिंदा राजपक्षे यांच्यावर त्यांच्याच श्रीलंका पोदुजना पेरामुना (एसएलपीपी) पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून राजीनाम्यासाठी मोठा दबाव येत होता. मात्र त्यांनी आपल्या समर्थकांचा मेळावा आयोजित करून पंतप्रधानपद न सोडण्याची भूमिका घेतली होती. मात्र आता राजीनामा देत हंगामी सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशावरील संकटावर मात करण्यासाठी भविष्यातही कोणताही त्याग करण्यास मी तयार असेन, असे महिंदा यांनी म्हटले.

मंत्री, खासदारांची घरे भक्ष्यस्थानी

महिंदा राजपक्षे यांच्यासह माजी मंत्री निमल लांझा, समनलाल फर्नाडो, महिंदा कहांदागामगे, अरुंदिका फर्नाडो, खासदार सनथ निशांत, माजी मंत्री जॉन्सन फर्नाडो यांच्यासह अनेक मंत्री, खासदारांची निवासस्थाने जाळण्यात आली़ निदर्शकांनी राजपक्षे कुटुंबीय आणि त्यांच्या निष्ठावंतांना लक्ष्य केल्याचे चित्र आह़े

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा