१००हून अधिक जखमी; कोलंबोमध्ये लष्कर तैनात

कोलंबो : श्रीलंकेत सरकार समर्थकांनी सरकारविरोधात आंदोलन करणार्‍यांवर सोमवारी हल्‍ले चढविल्यामुळे परिस्थिती आणखी चिघळली आहे. राजधानी कोलंबोत उफाळलेल्या हिंसाचारामुळे मोठा तणाव निर्माण झाला. यानंतर देशव्यापी संचारबंदीची घोषणा केली असून, कोलंबोत लष्कराला
पाचारण केले आहे.

अध्यक्ष गोटाबाय राजपक्षे यांच्या कार्यालयासमोर सरकार समर्थक आणि विरोधक एकमेकासमोर आले. या वेळी झालेल्या हिंसाचारात 100हून अधिक नागरिक जखमी झाले. हिंसाचाराचे लोण देशभर पसरू नये, यासाठी देशव्यापी संचारबंदी लागू केली आहे.

पंतप्रधान महिंद राजपक्षे पदत्याग करणार असल्याचे वृत्त पसरले होते. त्यामुळे हा हिंसाचार उफाळून आला. महिंद राजपक्षे यांचे मोठे बंधू आणि अध्यक्ष गोटाबाय राजपक्षे यांच्यावर महिंद यांनी पदत्याग करावा, यासाठी दबाव वाढत आहे. अध्यक्ष राजपक्षे यांनी अंतर्गत सरकार स्थापन करण्याचे आश्‍वासन दिले होेते. या पार्श्‍वभूमीवर सरकार समर्थक गटाने सरकार विरोधात आंदोलन करणार्‍या गटावर हल्‍ले चढविला. त्यानंतर देशव्यापी संचारबंदी लागू केली.

देशातील आर्थिक संकटाला राजपक्षे बंधू जबाबदार असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी जनता आणि विरोधी पक्षांकडून केली जात आहे. या घडामोडीच्या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी अध्यक्ष राजपक्षे यांनी देशात आणीबाणी लागू केली होती.

देशात अगोदरच अन्‍न, इंधन यांची टंचाई असून महागाई प्रचंड वाढली आहे. परकीय चलनसाठा संपत चालला आहे. अशा कठीण परिस्थितीतून मार्ग काढायचा कसा असा प्रश्‍न सरकार, जनता आणि राजकीय नेत्यांसमोर उभा ठाकला आहे. यापूर्वी सरकारविरोधात जनतेने आंदोलन केले होते. हजारोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा तातडीने करा, इंधन, औषधे आणि वीजेचा पुरवठा तातडीने करा, अशी मागणी त्यांनी केली होती.

हिंसेने वाढते हिंसा, शांतता राखा : राजपक्षे

हिंसेने हिंसा वाढते. आर्थिक संकटावर मार्ग काढण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. तुम्ही शांतता राखा, असे आवाहन राजपक्षे बंधुंनी केले आहे. तर जनतेसाठी सर्वस्व पणाला लावले जाईल, असे आश्‍वासन पंतप्रधान महिंद राजपक्षे यांनी केले. लंका पहिली त्यानंतर मी आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा