पुणे : कर्मचार्‍यांचा संप मिटल्यानंतर पुणे विभागातील सर्व मार्गावर बस वेळापत्रकानुसार धावत आहेत. प्रवासी संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे बस स्थानकांत गर्दी होत आहे. मार्गस्थ होणार्‍या बहुतांश बस प्रवाशांच्या गर्दीने फुल्ल होऊन धावत आहेत. लांब पल्ल्याच्या बसला आगाऊ आरक्षणाला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे.
एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करा, या मागणीसाठी एसटीच्या कर्मचार्‍यांनी राज्यभर बेमुदत संप पुकारला होता. दीर्घ कालावधीनंतर संपातील कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण क्षमनेते बस धावत आहेत. स्वारगेट, वाकडेवाडी (शिवाजीनगर) पुणे रेल्वे स्थानक बस स्थानकांसह जिल्ह्यातील विविध बस स्थानकांतून रोज हजारो प्रवासी प्रवास करत आहेत. वाढलेल्या प्रवाशांमुळे एसटीच्या तिजोरीत रोज अधिकच्या उत्पन्नाची भर पडत आहे.
पुणे हे राज्यातील अत्यंत महत्त्वाचे शहर आहे. त्यामुळे शहरातून राज्याच्या कानाकोपर्‍यात बस धावतात. तसेच राज्यभरातून शहरात बस येत असतात. त्यातून ये-जा करणार्‍या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यातच उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत. त्यामुळे एसटी बसने प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. कर्मचारी आंदोलनामुळे तोट्यात अडकलेल्या एसटी महामंडळाला प्रवाशांच्या प्रतिसादामुळे दिलासा मिळत आहे. तसेच वाढलेल्या रोजच्या उत्पन्नामुळे एसटीच्या अडचणी दूर होण्यासही मदत होणार आहे.
कर्मचारी आंदोलनापूर्वी पुणे विभागात एसटीने रोज एक लाख प्रवासी प्रवास करत होते. त्यातून एसटीला रोज सुमारे एक कोटी उत्पन्न मिळत होते. सद्य:स्थितीत रोज एक लाख 10 हजार प्रवासी प्रवास करत आहेत. त्यातून एक कोटी 15 लाख रूपयाचे उत्पन्न एसटीला मिळत आहे. रोज 747 बस धावत आहेत. रोजच्या बसच्या फेर्‍यांची संख्या 3 हजारापर्यंत पोहचली आहे. उन्हाळी सुट्ट्यांमुळे आणखी अधिकच्या बसचे नियोजन प्रशासनाकडून सुरू आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा