अनेक गाड्या अद्यापही बंदच; प्रवाशांवर इतर पर्याय शोधण्याची वेळ
पुणे : उन्हाळी सुट्ट्या, लग्न सोहळे, पर्यटनासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आहेत. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रवासी नेहमीच रेल्वेला प्राधान्य देतात. मात्र रेल्वे बोर्डाने कोरोना काळात बंद केलेल्या अनेक गाड्या अद्यापही सुरू केल्या नाहीत. परिणामी रेल्वे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रवाशांना गैरसोय सहन करत प्रवास करावा लागत आहे. अन्यथा इतर पर्यायी वाहनांचा शोध घ्यावा लागत असल्याचे चित्र आहे.
कोरोना संसर्गामुळे अनेक रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. त्यात पुण्यातून सुटणार्‍या तसेच देशभरातून पुण्यात येणार्‍या रेल्वे गाड्यांचा त्यात समावेश होता. मात्र आता सर्व नियम शिथील करण्यात आले आहेत. सर्व व्यवहार सुरळीत झाले आहेत. रेल्वेने प्रवास करणार्‍यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र अद्यापही बंद करण्यात आलेल्या काही गाड्या सुरू करण्यात आल्या नसल्याने रोजच रेल्वे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बर्‍याच वेळा प्रवाशांना तिकीट उपलब्ध होत नसल्याने अधिकचे पैसे मोजून इतर पर्यायी वाहनाने प्रवास करावा लागत असल्याच्या तक्रारी प्रवासी करत आहेत.
पुण्यातून देशभरात रेल्वे गाड्या जातात तसेच येतही असतात. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रवासी रेल्वेला प्राधान्य देतात. मात्र अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू झाल्या नसल्याने प्रवाशांना कधी गाड्या बदलत, तर कधी वळसा घालत प्रवास करावा लागत आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वेचे तिकीट सर्वांनाच परवडणारे असते. मात्र इतर वाहनांचे तिकीट परवडणारे नसले, तरी नाईलाजास्तव अनेकांना अधिकचे पैसे मोजून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या ज्या रेल्वे गाड्या अद्यापही सुरू करण्यात आलेल्या नाहीत. त्या गाड्या तात्काळ सुरू करून प्रवाशांची गैरसोय टाळावी असे आवाहन रेल्वे प्रवासी करत आहेत.
बंद गाड्याबाबत रेल्वे प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा हर्षा शहा म्हणाल्या, कोरोनामुळे काही गाड्या बंद करण्यात आल्या. मात्र आता संपूर्ण व्यवहार सुरळीत झाले आहेत. त्यामुळे रेल्वेने बंद केलेल्या सर्व गाड्या सुरू केल्या पाहिजेत. गाड्याअभावी प्रवाशांची गैरसोय होते. तसेच आरक्षित तिकिटाचा कोटा तसेच अनारक्षित तिकिटांची संख्या वाढविली पाहिजे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टळेल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा