मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ५३ व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा 75 धावांनी दणदणीत विजय झाला असून केकेआरचा पूर्ण संघ फक्त 101 धावा करु शकला. गोलंदाजांनी आपली भूमिका चोख बजावल्यामुळेच लखनऊला विजयाची गोडी चाखता आली. लखनऊने केकेआरसमोर विजयासाठी 177 धावांचे लक्ष्य ठेवले होते.

लखनऊने विजयासाठी दिलेल्या 177 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाची चांगलीच फ्या फ्या उडाली. कोलकात्याचा आंद्रे रसेल वगळता बाकी कोणत्या खेळाडू समाधानकारक फलंदाजी करु शकला नाही. कोलकाता संघाचे फलंदाज ठराविक अंतरावर बाद होत गेले. सलामीला आलेला बाबा इंद्रजित शून्यावर झेलबाद झाला. तर दुसर्‍या बळीसाठी आलेला श्रेयस अय्यरदेखील फक्त 6 धावा करुन तंबुत परतला. त्यानंतर मात्र कोलकाता संघाचे फलंदाज बाद होत गेले.

सलामीला आलेल्या अरॉन फिंचने फक्त 14 धावा केल्या. तर नितीश राणा (2), रिंकू सिंह (6) या दोघांनीही पुरती निराशा केली. रिंकू सिंह बाद झाल्यानंतर कोलकाता संघाची 69 धावांवर पाच गडी बाद अशी दुर्दशा झाली. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या आंद्रे रसेल आणि सुनिल नरेन (22) या जोडीने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघेही झेलबाद झाल्यानंतर केकेआरच्या विजयाच्या आशा मावळल्या.

शेवटच्या फळीतील चार फलंदाज फक्त तीन धावा करु शकले. परिणामी कोलकाता नाईट रायडर्स संघाचा डाव 15 व्या षटकातच गुंडाळला. पूर्ण गडी बाद होईपर्यंत केकेआरला फक्त 101 धावा करता आल्या. यापूर्वी नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्सने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी आल्यानंतर लखनऊची खराब सुरुवात झाली. सलामीला आलेला लखनऊचा कर्णधार केएल राहुल पहिल्याच षटकात धावबाद झाला. त्याला खातंदेखील उघडता आलं नाही. त्यानंतर मात्र दुसर्‍या विकेटसाठी आलेल्या दीपक हुडा आणि क्विंटन डी कॉक या जोडीने धमाकेदार खेळी केली.

क्विंटन डी कॉकने 29 चेंडूंमध्ये 50 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर दीपक हुडानेदेखील 27 चेंडूंमध्ये 41 धावा केल्या. मधल्या फळीतील फलंदाजांनीही समाधानकारक खेळी करत लखनऊचा धावफलक खेळता ठेवला. तिसर्‍या विकेटसाठी आलेल्या कृणाल पांड्याने 27 चेंडूंमध्ये 25 धावा केल्या. तर आयुष बदोनी (15 नाबाद), मार्कस स्टॉईनीस (28) जेसन होल्डर (13) यांनी सामाधानकार खेळी करून लखनऊला 176 धावांपर्यंत नेऊन ठेवलं.

लखनऊच्या गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी केली. गोलंदाजांनी आपली भूमिका चोख बजावल्यामुळेच केकेआरसारख्या संघाला 101 धावांपर्यंत रोखता आले. आवेश खानने नितीश राणा, आंद्रे रसेल आणि अनुकूल रॉय अशा दिग्गज फलंदाजांना तंबुत पाठवलं. तर जेसन होल्डरनेही सुनिल नरेन, टीम साऊदी, अरॉन फिंच या तिघांना बाद करत लखनऊचा विजय सोपा केला. मोहसीन खान, दुष्यमंथा छमिरा, रवी बिश्नोई या तिघांनी प्रत्येकी एक बळी घेत आवेश आणि जेसन यांना मदत केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा