पिंपरी : दोन वर्षांच्या खंडानंतर संत तुकाराम महाराजांची पालखी यंदा 20 जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. देहू संस्थानच्या वतीने रविवारी यंदाच्या वारीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.

दि. 10 जुलै रोजी आषाढी एकादशी असून, त्यानिमित्त श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी संत तुकाराम महाराजांची पालखी 20 जून रोजी देहू येथून निघणार आहे. यंदा तुकोबारायांच्या पालखीबरोबर वारीमध्ये एकूण 329 दिंड्या सहभागी होणार आहेत. पायी प्रवास पूर्ण करून पालखी 9 जुलैला पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे. तर, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी येथून 21 जून रोजी पंढरपूरकडे निघणार आहे.

तुकोबांच्या पालखीमध्ये ’रिंगण’ हे विशेष आकर्षण असते. यामध्ये ’गोल रिंगण’ आणि उभे रिंगण अशी दोन प्रकारचे रिंगणे असतात. गोल रिंगणामध्ये पालखीभोवती वारकरी साखळी करून फेर धरतात. त्यानंतर दोन मानाचे घोडे गोलाकार फिरतात. मात्र यामध्ये एकच घोडेस्वार असतो. दुसर्‍या घोड्यावर तुकोबा स्वार असतात, अशी वारकर्‍यांची श्रद्धा आहे. यंदा कोरोना आटोक्यात असल्याने वारीसाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या आपला लवाजमा, दिंड्या आणि वारकर्‍यांसह विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरपूर येथे रवाना होणार आहेत.

वारीचा संक्षिप्त कार्यक्रम

पालखी प्रस्थान – 20 जून 2022
पहिलं गोल रिंगण – 30 जून 2022 (बेलवंडी)
दुसरं गोल रिंगण – 2 जुलै 2022 (इंदापूर)
तिसरं गोल रिंगण – 5 जुलै 2022 (अकलूज माने विद्यालय)
पहिलं उभं रिंगण – 6 जुलै 2022 (माळीनगर)
दुसरं उभं रिंगण – 8 जुलै 2022 (बाजीराव विहीर)
तिसरं उभं रिंगण – 9 जुलै 2022 (पादुका आरती)

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा