पुणे : खाद्यतेलाच्या दरवाढीला आळा घालण्यासाठी खाद्यतेल व तेलबियांच्या साठ्यावर मर्यादा घालण्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र त्यानंतरही खाद्यतेलांची दरवाढ थांबत नसल्याचे चित्र बाजारात आहे. एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात तेलाच्या दरात वाढ झाली आहे. या दरवाढीने महागाईत भर पडली आहे. खाद्यतेलाची दरवाढ सर्वसामान्यांना परवडत नसल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
खाद्यतेलांच्या दरवाढीमुळे उत्तरेकडील पाच राज्ये वगळून देशभरात खाद्यतेल तसेच तेलबियांच्या साठ्यावर मर्यादा घालण्यात आली होती. उत्तरेकडील पाच राज्येही एप्रिलपासून साठा मर्यादेच्या कक्षेत आणण्यात आली आहेत. मात्र तरी दरवाढीवर आळा बसला नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवरील आणि विशेषत: युक्रेनमधील घडमोडींचा परिणाम तेल दरवाढीवर कायम राहिला आहे. तेलाचे दर सातत्याने वाढत आहेत.
पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्तान या पाच राज्यात तेलबिया तसेच तेलसाठ्यावर मर्यादा नव्हती. एक एप्रिलपासून केंद्रशासनाने उत्तरेकडील पाच राज्येही साठा मर्यादेच्या कक्षेत आणली आहेत. देशभरातील सर्व राज्यात तेलबिया, तेलसाठ्यावरील मर्यादा डिसेंबर 2022 पर्यंत लागू राहणार आहेत. साठा मर्यादेत तेलबिया, तेल आणल्यानंतर दर कमी होण्याची शक्यता अजिबात नाही. कारण आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम तेलाच्या आवकेवर झाला आहे. भारतात दरवर्षी 150 ते 160 लाख टन तेल आयात केले जात असल्याचे मार्केट यार्डातील तेल व्यापारी कन्हैयालाल गुजराथी यांनी सांगितले.
दरवर्षी 70 ते 80 लाख टन पामतेल आयात केले जाते. साधारणपणे 70 टक्के पामतेल इंडोनेशियातून आयात केले जाते. मलेशियातून 20 टक्के तेल आयात केले जाते. रशिया-युक्रेन युद्धामुळे सूर्यफूल तेलाची आयात कमी झाली आहे. दरवर्षी भारत 30 लाख टन सूर्यफूल तेल आयात करतो. त्यापैकी 70 टक्के सूर्यफूल तेलाची आयात एकट्या युक्रेनमधून होते. उर्वरित आयात रशिया, अर्जेंटिनातून होते. सोयाबीन तेलाची आयात अर्जेंटिना, ब्राझील तसेच अमेरिकेतून होते. तेथील हवामानातील बदलामुळे यंदा सोयाबीनची लागवड कमी झाली असून सोयाबीन तेलाची आवक अपुरी पडत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर घडामोडींचा विचार करून यापुढील काळात टप्प्यप्प्प्याने तेलाचे दर वाढणार आहेत, याकडे गुजराथी यांनी लक्ष वेधले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा