महाराष्ट्राला धोका नाही; वायव्य बंगालच्या उपसागराकडे वादळ सरकणार
पुणे : आग्नेय बंगालच्या उपसागरावर आणि लगतच्या दक्षिण अंदमान समुद्रावर चांगले चिन्हांकित कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राचे रविवारी तीव्र चक्री वादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. मात्र हे वादळ ओडिशाच्या किनार्‍यापासून वायव्य बंगालच्या उपसागराकडे जाण्याची शक्यता असल्याने या वादळाचा महाराष्ट्राला कोणताही धोका नसल्याचे हवामान विभागाने शनिवारी स्पष्ट केले.
दक्षिण अंदमान समुद्र आणि शेजारील कमी दाबाचे क्षेत्र चांगले चिन्हांकित कमी दाबाचे क्षेत्र बनले आहे. हे क्षेत्र शनिवारी आग्नेय बंगालच्या उपसागरावर आणि लगतच्या दक्षिण अंदमान समुद्रावर कायम होते. हे क्षेत्र वायव्येकडे सरकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली. आग्नेय बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होऊन आज पूर्वमध्य बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. येत्या मंगळवारी संध्याकाळपर्यंत हे वादळ वायव्येकडे सरकत राहण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर हे वादळ उत्तर आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनारपट्टीपासून पश्चिम मध्य आणि लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरात पोहोचणार आहे. त्यानंतर, ते उत्तर-ईशान्य दिशेला वळेल आणि ओडिशाच्या किनार्‍यापासून वायव्य बंगालच्या उपसागराकडे जाण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.
विदर्भात उष्णतेची लाट
मागील आठ ते दहा दिवसांपासून बहुतांश विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. येत्या बुधवारपर्यंत ही लाट कायम असणार आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात पुढील तीन दिवस हवामान कोरडे असेल. बुधवारी येथे पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मराठवाड्यात मात्र हवामान कोरडे असणार आहे. कोरड्या हवामानामुळे राज्यात बहुतांश ठिकाणच्या कमाल तपमानात वाढ झाली आहे. राज्यात शनिवारी चंद्रपूर येथे उच्चांकी 45.2 अंश कमाल तपमानाची नोंद झाली. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात कमाल तपमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे.
पुण्यातील पारा 40 अंशावर
ढगाळ वातावरणामुळे मागील चार दिवसांत कमाल तपमानात घट झाली होती. मात्र आता ढगाळ वातावरण निवळले असल्याने कमाल आणि किमान तपमानात वाढ झाली आहे. शनिवारी शहरात 40 अंश कमाल, तर 20.4 अंश किमान तपमानाची नोंद झाली. पाषाण आणि लवळे परिसरातही 40 अंशाची नोंद झाली, तर लोहगाव आणि मगरपट्टश परिसरात 41 अंश कमाल तपमनाची नोंद झाली. पुढील चार दिवस शहरात सायंकाळी आकाश अशंत: ढगाळ असणार असल्याचा अंदाज आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा