अनुराग ठाकूर यांच्या विरोधात एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांची निदर्शने
पुणे : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना विद्यार्थ्यांच्या निदर्शनाला सामोरे जावे लागले. ‘वुई स्टँड अगेंस्ट पॉलिटिक्स ऑफ हेट’, ‘मिनिस्टर ऑफ हेट यू आर नॉट वेलकम’, ‘देश के गद्दारो को, गोली मारो सालो को’ असेे फलक हातात घेत एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी गुरूवारी ठाकूर यांच्या विरोधात मूक निदर्शने केली.
फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय)च्या भेटीला अनुराग ठाकूर काल आले होते. ठाकूर यांचे एफटीआयआयमध्ये आगमन होताच येथील विद्यार्थ्यांनी फलक झळकावत एफटीआयआयमधील भेटीला विरोध दर्शविला.
कोरोनामुळे एफटीआयआयमध्ये ऑफलाईन पद्धतीने शिक्षण सुरू झाले आहे. मात्र, संस्थेने केलेली शुल्कवाढ, पायाभूत सुविधा, नियामक मंडळात विद्यार्थी प्रतिनिधीचा असलेला अभाव या गोष्टी विद्यार्थ्यांना भेडसावत आहेत. यातच देशात जातीय तेढ निर्माण करणार्‍या मंत्र्याचे संस्थेत केलेले जाणारे स्वागत खटकल्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांच्याविरोधात आंदोलन केले. मंत्री अनुराग ठाकूर यांनी संस्थेचे पदाधिकारी आणि विभागप्रमुखांची बैठक घेतली. विद्यार्थ्यांना त्यांचे प्रश्न मंत्र्यासमोर मांडायचे होते. मात्र विद्यार्थ्यांना संवाद साधण्यासाठी मज्जाव केला जात होता.
विद्यार्थ्यांनी संस्थेच्या अध्यक्षांकडे सातत्याने विनंती केल्यानंतर दोन मिनिटे त्यांना भेटण्याची संधी मिळाली. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी ’शुल्कवाढ रद्द केली जावी आणि सर्वासामान्यांना परवडेल असे शिक्षण द्यावे, एफटीआयआय इन्स्टिट्यूटला राष्ट्रीय दर्जा द्यावा, मेससाठीचे अनुदान परत सुरू करावे, दर्जेदार शिक्षण मिळावे आणि एफटीआयआयचे खासगीकरण थांबवावे, विद्यार्थ्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणू नये अशा मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या. तुम्हाला या समस्या का वाटतात? असा सवाल ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना केला असल्याचे विद्यार्थी संघटनेतर्फे सांगण्यात आले.
एफटीआयआय विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा अवंती बसर्गेकर म्हणाल्या, अनुराग ठाकूर कधी संस्थेमध्ये आलेले नाहीत. त्यांनी पूर्वी राजकीय फेरीमध्ये अल्पसंख्यांकांना लक्ष्य करीत काही वक्तव्य केली होती. देशात जातीय विद्वेष पसरविणारे त्यांचे विचार आम्हाला मान्य नाहीत. त्याचा आम्ही निषेध करतो. हे आम्हाला दर्शवायचे होते. ठाकूर यांनी आम्हाला दोन मिनिटे संवाद साधण्यासाठी वेळ दिला. संस्थेमध्ये सुरक्षा अधिकार्‍यांना विद्यार्थ्यांवर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे आमच्या स्वातंत्र्यावर गदा आली आहे. मुलींना कुठे चाललात असे प्रश्न विचारले जातात. हे सर्व मुद्दे आम्ही त्यांच्यासमोर मांडले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा