शेअर बाजार कोसळला; कर्जाचे हप्ते महागणार

मुंबई : देशातील वाढत्या चलनवाढीला आळा घालण्यासाठी रिझर्व बँकेने बुधवारी प्रदीर्घ कालावधीनंतर अचानक रेपो दरात 0.40 टक्क्यांची वाढ केली. त्यामुळे रेपो दर 4.40 टक्क्यांवर पोहोचला. आता गृह, वाहन आणि इतर कर्जाच्या हप्त्यांमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. तसेच, सर्वसामान्यांना कर्ज घेणे अधिक महाग होणार आहे. दुसरीकडे, या निर्णयाचे शेअर बाजारात जोरदार पडसाद उमटले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 1306.96 अंकांनी घसरला.

रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्‍तिकांत दास यांनी काल पत्रकार परिषद घेत रेपो दरवाढीचा माहिती दिली. ऑगस्ट 2018 पासून रेपो दर स्थिर होता.रिझर्व बँकेने रेपो दरात वाढ केली असली, तरी रिवर्स रेपो दराबाबत काहीही नमूद केले नाही. त्यामुळे रिवर्स रेपो 3.35 टक्के इतकाच आहे. मात्र, रिझर्व बँकेने रोख राखीव प्रमाण (सीआरआर) 4.5 टक्क्यांनी वाढवले आहे. ज्यामुळे बँकांना आता रिझर्व बँकेकडे अधिक ठेव ठेवावी लागणार आहे. यामुळे 87 हजार कोटींची तरलता कमी होईल, असे शक्तिकांत दास यांनी सांगितले.

चालू आर्थिक वर्षात एप्रिल महिन्यात महागाईचा दर 4.5 वरून 5.7 टक्के झाला, तर सकल घरेलु उत्पादन वाढीचा दर 7.2 वरून 7.8 टक्के झाला आहे.
केंद्रीय चलनविषयक धोरण समितीची बैठक काल शक्‍तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.गेल्या दोन वर्षांपासून रिझर्व बँकेने उदार धोरण ठेवले होते. एप्रिल 2022 पर्यंत चलनविषयक धोरण समितीच्या मागील 11 बैठकांत व्याजदर ‘जैसे थे’ होते.

शक्तिकांत दास म्हणाले की, रशिया-युक्रेन युद्धाबाबतची वाढती अनिश्चितता आणि रशियावर लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे खनिज तेलाच्या वाढलेल्या किमती आणि आंतरराष्ट्रीय बाजारात गहू आणि खाद्यपदार्थांच्या वाढलेल्या किमतीमुळे हा निर्णय घेण्यात आला. मात्र, महागाईचा दर काही काळ कायम राहील.

रिझर्व बँकेने रेपो दरात वाढ केल्यानंतर त्याचा परिणाम शेअर बाजारांवर दिसून आला. दुपारच्या सत्रात निर्देशांक तब्बल 1,400 अंकांनी आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 400 अंकांनी घसरला. दिवसअखेर निर्देशांक 1,306.96 अंकानी घसरून 55,669.03 अंकावर स्थिरावला. तर, निफ्टीमध्ये 391.50 अंकाची घसरण होत 16,677.60 अंकावर बंद झाला.

शेअर बाजार बंद झाला तेव्हा महत्त्वाच्या 30 पैकी 27 समभागांत मोठी घसरण दिसून आली. तर, तीन समभाग तेजीत होते. यात पॉवरग्रीड, एनटीपीसी आणि कोटक बँकेचा समावेश होता. तर, बजाज फिनसर्व, टायटन, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक, मारूती, रिलायन्स, एशियन पेंट्स, अ‍ॅक्सिस बँक, डॉ. रेड्डी लॅब, टाटा स्टील, भारती एअरटेल, एचडीएफसी, एचयूएल, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, एचसीएल टेक, टीसीएस आदीच्या समभागात मोठी घसरण झाली.

रेपो रेट म्हणजे काय?

रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँक रिझर्व बँकेकडून पैसे घेते तो दर. रेपो रेट वाढणे म्हणजे बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणार्‍या कर्जदरात वाढ होणे; तर रेपो रेट कमी होणे म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणे. म्हणजेच रिझर्व बँकेने रेपो दर वाढवला, तर पर्यायाने सर्व बँकांना ग्राहकांना द्यावयाच्या कर्जाचे दरही वाढवावे लागतात. तसेच, रेपो दर कमी झाला तर व्याजदर कमी होतो.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा