सर्वसामान्यांना कर्जाचे चटके

मुंबई : महागाईला आटोक्यात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात ०.४० टक्क्यांची वाढ करुन सर्वसामान्यांना धक्का दिला आहे. या दरवाढीनंतर बँकेचा रेपो दर ४.४० टक्के झाला असून सर्वच प्रकारची कर्ज महागण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज बुधवारी ४ मे २०२२ रोजी पत्रकार परिषद घेतली. यावेळी दास यांनी व्याजदर वाढीची घोषणा केली. नवे व्याजदर आजपासून लागू झाले आहेत.

देशात महागाईने कहर केला आहे. मार्च महिन्यात किरकोळ महागाईचा दर ६.९५ टक्के इतका वाढला होता. मागील १७ महिन्यांतील किरकोळ महागाईचा हा उच्चांकी दर ठरला. खाद्य वस्तूंच्या किंमतीत झालेली प्रचंड वाढ महागाईचा पारा वाढण्यास कारणीभूत ठरली होती. त्यामुळे २ ते ४ मे २०२२ दरम्यान रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची तातडीची बैठक झाली. या बैठकीत एकमुखाने व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे दास यांनी यावेळी सांगितले.

रिझर्व्ह बँकेने ८ एप्रिल २०२२ रोजी पतधोरण स्थिर ठेवले होते. मात्र महागाईवर बारीक लक्ष ठेवून राहणार असल्याचे शक्तिकांत दास यांनी म्हटले होते. रशिया-युक्रेन युद्धाचे परिणाम आता जाणवत असल्याचे दास यांनी सांगितले. या दरवाढीनंतर रेपो दर ४.४० टक्के झाला आहे. तर स्टॅंडिंग डिपाॅझिट फॅसिलीटी रेट ४.१५ टक्के झाला आहे. बँक रेट ४.६५ टक्के आणि सीआरआर अर्धा टक्क्याने वाढून ४.५० टक्के झाला आहे.

पेट्रोल-डिझेल, सीएनजी, स्वयंपाकाचा गॅस, दूध, भाजीपाला, मांस, अंडी यासारखे खाद्यान्न तसेच दैनंदीन वापराच्या वस्तूच्या किंमतीत वाढ झाल्याने घाऊक आणि किरकोळ बाजारात महागाईचा आगडोंब उसळला आहे. मार्च महिन्यात घाऊक बाजारातील महागाई दर १४.५५ टक्के इतका वाढला आहे. महागाईचा हा उच्चांकी स्तर आहे. त्याआधीच्या फेब्रुवारी महिन्यात तो १३.११ टक्के इतका होता. त्यानंतर काही बँकांनी कर्जाचे दर वाढवले होते.

कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची पीछेहाट झाली असून यातून पुन्हा कोरोनापूर्व स्थितीत येण्यासाठी निरंतर प्रयत्न करावे लागणार आहेत. अर्थव्यवस्थेची कोरोनापूर्व स्थिती दिसण्यासाठी आणखी किमान १५ वर्षे लागणार असून २०३५ हे वर्ष त्यासाठी उजाडेल, असे स्पष्ट निरीक्षण रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नोंदवले आहे. ‘दि रिपोर्ट ऑन करन्सी अँड फायनान्स फॉर दि इयर’ २०२१-२२ असे या अहवालात म्हटले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा