सौरभ वैशंपायन

श्री शिवजयंती उत्सव सुरू करून भारतीयांमध्ये चैतन्य निर्माण करणार्‍या लोकमान्य टिळकांवर शिंतोडे उडविण्याचा उद्योग काहींनी सुरू केला आहे. त्या प्रवृत्तीचा समाचार घेणारे लेख…

लोकमान्य टिळकांनी रायगडावरील छत्रपती शिवरायांच्या समाधीवरील छत्रीचे काम लोकसहभागातून घडावे म्हणून फंड जमा करण्याचे काम सुरु केले. तेव्हाही बौद्धिक मुडदूस झालेल्या अनेकांनी रायगडवरील समाधीच्या जीर्णोद्धाराचे काम आताच काढून टिळकांनी ब्राह्मण भोजनाचा घाट घातला! असे त्यांच्या बुद्धिप्रमाणेच अत्यंत हीन, जातीय आणि हिणकस शेरे मारले. टिळकांना किती यातना झाल्या असतील याची कल्पनाही करवत नाही. त्यांनी मिळालेल्या पै अन् पैचा हिशोब ‘केसरी’त द्यायला सुरुवात केली तेव्हा आपसू्क ही वायफळ वाजणारी कृतीशून्य तोंडे बंद झाली. एक शिष्टमंडळ घेऊन लोकमान्य टिळक छत्रपती शाहू महाराजांना भेटले. रायगडावरील छत्रीसाठी पैशांची व्यवस्था करु! असे आश्वासन शाहू महाराजांनीही दिले. हॅरीस नामक एका ब्रिटिशाच्या स्मारकासाठी चाळीस एक हजार रुपये त्याकाळी जमा झाले; पण शिवसमाधीसाठी जेमतेम नऊ हजार रुपये जमा झाले. याचे शल्य टिळकांना खात होते. काहींनी शिवस्मारकाचे वेळखाऊ काम हाती घेतल्याने टिळकांना राष्ट्रीय सभेचे काम कसे जमणार? असे विचारताच त्यांनी राष्ट्रीय सभेच्या चिटणीसपदाचाच राजीनामा देऊन टाकला.

1885 च्या एप्रिलमध्ये महाड विभागाच्या जंगल अधिकार्‍याने रायगड वनखात्याच्या अधिकारात असल्याने उत्सवाला मी परवानगी देणार नाही असे म्हटल्यावर टिळकांनी लॉर्ड सँढर्सकडून परवानगी मिळवली आणि त्यावर्षी रायगडावरती जल्लोषात उत्सव केला. रायगडवरील उत्सवाबाबत अजून एक किस्सा म्हणजे कार्यक्रमासाठी मुंबईवरून कोकणात जाण्यासाठी बोटीच्या धक्क्यावर उभे असतानाच कोणीतरी टिळकांसाठी निरोप घेऊन आले की त्यांचा मुलगा अत्यंत आजारी आहे. परत पुण्यास निघून यावे. टिळकांनी उत्तर पाठवले उत्सवासाठी रायगडावर निघालो आहे, मी परतून येईपर्यंत याबाबत कुठलीही बातमी मला कळवू नये!

वरती उल्लेख केलेल्या फंडात पुढे पुढे पैसा जमत गेला. समिती स्थापन झाली. टिळक विश्वस्त नेमले गेले. शिवसमाधीबाबत या माणसाचा ध्यास तरी किती असावा? मंडालेमध्ये हा माणूस मधुमेह, उष्णतेने डोके – पाठ यांना येणारी गळवे, दातदुखी, ताप यांनी हैराण होता. त्या अवस्थेत तिथूनही शिवस्मारक कसे बनावे त्याबाबत 5 जून 1909 मधील पत्रातून ते लिहितात-

रायगड येथील समाधीविषयी दाजीसाहेब खरे यांना सांगावे की, हे बांधकाम उगीच भारी खर्चाचे करावे असे मला वाटत नाही. आपल्या हाती फंड 25,000 रु. सरकारची देणगी धरुन 30,000 होतील. पैकी दहा हजार तरी गंगाजळीसारखे बाजूला काढून ठेवलेच पाहिजेत. एरवी सालोसाल पूजाअर्चा वगैरेंचा खर्च कसा कराल? समाधीची दुरुस्ती आणि छत्री या दोहोंवर मिळून वीस हजारांवर अधिक खर्च होऊ नये. म्हणजे सुरुवातीचा अंदाज सोळा हजारांचाच धरावा. तेव्हा वरचे चार हजार घालून काम पुरे होईल. अंदाजात वाढावा होतच असतो. वीस हजारात एखादी मोठी किंवा कलाकुसरीची इमारत उठवणे शक्य नाही. छत्री मजबूत व टिकाऊ व्हावी. देखणी नसली तरी चालेल आणि तशी ती आहे त्या रकमेत बांधता येईल. पंधरा हजारात छत्रीचे काम उरकले तरी बरे. कारण रायगडावरील महादेवाच्या देवळाची दुरुस्ती करण्याला पाच हजार रुपये मिळाले तर हवेच आहेत. सिंहगडावर राजारामांची समाधी आहे. तोच नमुना का होईना? आहे ओबडधोबड पण दोन अडीचशे वर्ष टिकली आहे. कोल्हापुरासही तेथील महाराजांनी बांधलेल्या काही छत्र्या आहेत. ते नमुनेही वाटेल तर पहावे, मग पक्का नकाशा व अंदाजपत्रक करावे. पुन्हा एकवेळ सार्वजनिक विनंती करुन छत्रीच्या कामासाठी आणखी पैसे जमविता येतील असे दाजीसाहेब खरे यांना वाटत असेल, तर तेही अवश्य करुन पहावे. पण प्रत्यक्ष पैसा हाती आल्याशिवाय वाढत्या रकमेचे अंदाजपत्रक करु नये. रायगड हा एका बाजूस असल्याने भारी किंमतीची छत्री नसेल, तरी चालेल; पण शे-दोनशे वर्ष टिकेल अशी मात्र असावी. वरचेवर येणार्‍या आजारपणामुळे आपण काही मंडालेतून परत येणार नाही, अशी कधीतरी त्यांची भावना झाली असावी, तेव्हा त्यांनी 20 ऑगस्ट 1909 रोजी मंडालेजवळील मिकटिला तुरुंगातून आपले 6 पानी मृत्युपत्र बनवले होते. त्यातही त्यांनी सुरुवातीला घेणे व देणे असे दोन भाग बनवले आहे. त्यात देणे या सदरात –

रायगड येथे श्री शिवाजी महाराजांच्या समाधीवर छत्री बांधणे व त्यांच्या पूजेची कायमची तरतूद करणे यासाठी सरदार बळवंत रामचंद्र नातू यांच्या नावावर पुण्याच्या डेक्कन बँकेमध्ये ठेविलेल्या सुमारे पंचवीस हजार (25000) रुपये रकमेचा मी व्यवस्थापक आहे.

शिवाजी स्मारक पूर्वी ठरल्याप्रमाणे किल्ले रायगड येथे छत्री बांधणे व पूजेची कायमची तरतूद करणे याकडे विनियोग करण्यात यावा, ऑनरेबल मि. डि ए खरे यांना मी यासंबंधाने आपली इच्छा कळविली आहे, त्यांनी ते काम पूर्ण करावे व रा. खरे यांच्या सांगण्यावरुन नातू यांनी पैसे द्यावे. आपण परत जात नाही अशा भावनेतून लिहितानासुद्धा या महामानवाचा शिवस्मारकाचा ध्यास कायम होता. लोकमान्यांची छत्रपतींवरती किती नितांत श्रद्धा होती हेच यातून पदोपदी जाणवते. हा माणूसही अफाट होता व त्यांची श्री शिवरायांवरील निष्ठा देखील अविचल होती.

लोकमान्यांना बदनाम करण्याचे कारस्थान

लोकमान्य टिळक यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अत्यंत जिव्हाळा होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीसाठी पैसे गोळा केले आणि त्याचे पुढे काहीच झाले नाही, अशा गावगप्पा सध्या सुरू?आहेत. प्रत्येक पैशाचा हिशोब त्यांनी केसरीमधून दिलेला आहे. सर्व जातीजमातीच्या लोकांनी एकत्र येऊन शिवजयंतीचा उत्सव साजरा करावा म्हणून त्यांनी काम केले. इतर राज्यांमध्ये सुध्दा हा उत्सव साजरा झाला. लोकमान्य टिळकांनी शिवाजी महाराजांविषयी प्रेरणा निर्माण केली. त्यामुळे इतर राज्यांमध्ये सुध्दा उत्सव साजरे होऊ लागले. लोकमान्य टिळकांनी शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला की नाही? यापेक्षा त्यासाठी त्यांनी किती कष्ट घेतले, हे नाकारता कामा नये. पहिले कोणी केले, दुसरे कोणी केले? यापेक्षा लोकमान्य टिळकांनी 1895 सालापासून घेतलेले कष्ट महत्त्वाचे आहेत, मंडालेच्या तुरुंगात असतानाही शिवाजी महाराजांची मेघडंबरी कशी होणार? याची काळजी त्यांना होती. लोकमान्य टिळकांनी?आपल्या मृत्युपत्रामध्ये मेघडंबरी कशी झाली पाहिजे? याचा उल्लेख केला आहे. लोकमान्य टिळकांची बदनामी करण्यासाठी सध्या काही जणांकडून हा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. लोकमान्य टिळकांनी काय केले नाही, त्यापेक्षा काय केले? याकडे लक्ष दिले पाहिजे. मी सर्व भारतीयांच्या वतीने लोकमान्य टिळकांची माफी मागतो. जे कोण बोलले असतील त्यांना मी काही बोलू शकत नाही. पण लोकमान्य टिळकांचा हा जो अनादर झाला आहे, त्याकरिता राष्ट्रप्रेमी भारतीय म्हणून ही नैतिक जबाबदारी आपली आहे. आपण त्यांची माफी मागितली पाहिजे.

  • शैलेंद्र रिसबूड, लोकमान्य टिळक अभ्यासक

शिवजयंती उत्सव राष्ट्रीय पातळीवर नेण्याचे श्रेय टिळकांचे!

लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरू केला. ब्रिटिशांनी तो राजद्रोह ठरवला! परिणामाची तमा न बाळगता लोकमान्यांनी हा उत्सव राष्ट्रीय पातळीवर नेला. कोलकात्यासह अनेक ठिकाणी तो साजरा होऊ लागला. याद्वारे त्यांनी स्वराज्याची भावना भारतात जागवली. छत्रपती शिवरायांचे स्मारक असावे, त्यांच्या समाधीचा जीर्णोध्दार व्हावा ही लोकमान्यांची तळमळ होती. श्री शिवरायांचे मंदिर हेही प्रथम टिळकांनीच बांधले. त्यांनी महाराष्ट्राची अस्मिता, स्वत्व शिवचरित्रातून जागृत केले.

1895 मध्ये लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीच्या जीर्णोध्दारासाठी चळवळ सुरू केली. त्याच वर्षी एप्रिल महिन्याच्या अखेरीपासून ‘केसरी’मध्ये शिवस्मारकावर लेख प्रसिद्ध होऊ लागले. समाधीच्या जीर्णोध्दाराच्या दृष्टीने लोकमान्य टिळकांच्या पुढाकाराने 30 मे 1895 रोजी हिराबागेच्या मैदानावर महाराष्ट्र सरदार, दरकदार यांना बोलावून सभा भरवली गेली. पंतप्रतिनिधी अध्यक्षस्थानी होते.

या सभेत पहिला ठराव मदत मागणीचा, तर दुसरा ठराव स्मारक समिती नेमण्याचा होता. स्मारक समितीत 50 हून अधिक व्यक्ती नेमल्या गेल्या. कार्यकारिणीत टिळकांचे नाव होते. टिळकांच्या चळवळीमुळेच समाजातील सर्व घटक शिवस्मारकाचा विचार आस्थेने करू लागले. याच वर्षी पुण्यात भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाचा फायदा घेऊन लोकमान्य टिळकांनी शिवस्मारकाच्या कल्पनेला अखिल भारतीय स्वरूप देण्याचा योग साधला. नातू नावाचे गृहस्थ खजिनदार पदाची जबाबदारी सांभाळत होते. लोकमान्यांच्या सक्रिय सहभागाने रायगड किल्ल्यावर शिवजयंती उत्सव धडाक्यात साजरा झाला. या उत्सवाच्या अपूर्वतेने पुढे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर सर्वत्र छत्रपती शिवरायांचे उत्सव होऊ लागले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा