पुणे : उन्हाळ्यात जिवाची काहिली करणारा उकाडा आलाच. या वाढत्या उकाड्यात नागरिक मोठ्या प्रमाणात गारेगार कलिंगडाचे सेवन करतात. त्यामुळे कलिंगड आणि खरबुजाला मागणी वाढली आहे. घाऊक आणि किरकोळ बाजारात मागणी वाढल्याने शेतकर्‍यांना दरही चांगला मिळत आहे. मागणीच्या तुलनेत आवकही अधिक होत आहे.

व्यापारी पांडुरंग सुपेकर म्हणाले, खरबुजाचा हंगाम जानेवारीत सुरू होतो. तो जूनपर्यंत चालतो. जानेवारीत आवक कमी असते. या काळात थंडी असल्याने मागणीदेखील कमी असते. उन्हाळ्याची चाहूल लागली आणि वातावरणातील तपमान वाढू लागल्यानंतर मात्र मागणी आणि आवकही वाढते. या दरम्यान खरबुजाचे प्रति किलो सरासरी दर 15 ते 20 रुपये असतात. उन्हाळ्यात ते 20 ते 25 रुपयांदरम्यान असतात. हंगामाच्या पहिल्या टप्प्यात खरबुजाची 10 ते 12 टन सरासरी आवक होते. एप्रिल, मे महिन्यात ती 30 ते 35 टनांवर पोहोचते. खरबुजाचे विविध वाण आता विविध कंपन्यांनी विकसित केले आहेत. यातील तुलनेने अधिक गोड, चविष्ट वाणाला अन्य वाणांपेक्षा किलोला तीन ते चार रुपये अधिक दर मिळतो. खरबुजाची आवक प्रामुख्याने इंदापूर, दौंड, फलटण, नगर, कर्जत, श्रीगोंदा, तुळजापूर, सोलापूर, उस्मानाबाद आदी भागांतून होते. पुणे, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यांतील विविध तालुक्यांमधील किरकोळ आणि ठोक फळविक्रेते, स्टॉलधारक, फिरते विक्रेते यांच्याकडून खरेदी होते.

कलिंगड वर्षभर बाजारात उपलब्धता होऊ लागले आहे. मार्च ते मे हाच कालावधी मुख्य हंगामाचा असतो. या हंगामात पुणे बाजार समितीत नगर, सातारा, सोलापूर, टेंभुर्णी, इंदापूर, लातूर, उस्मानाबाद या भागांमधून दररोज साधारण 70 ते 80 टन आवक होते. हीच आवक बिगरहंगामात सुमारे 10 ते 15 टन असते. हंगामात प्रति किलोला 30 ते 35 रुपये, तर बिगर हंगामात हा दर 8 ते 10 रुपये मिळतो. रमजान महिन्यात मागणीमध्ये 40 टक्क्यांनी वाढ होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा