नवी दिल्ली : देशात कोळशाचा तीव्र तुडवडा जाणवत आहे. त्यामुळे विजेची स्थिती गंभीर बनली आहे. महाराष्ट्रासह 12 राज्यांवर विजेचे मोठे संकट ओढवले आहे. अनेक प्रकल्पांत केवळ एक दिवसाचा साठा शिल्लक आहे. राजधानी दिल्लीत कोणत्याही क्षणी बत्ती गुल होण्याची भीती व्यक्त केली जात आहे; तर मेट्रो, रेल्वे आणि रुग्णालयांचा वीजपुरवठा बाधित होऊ शकतो, असा इशारा दिल्ली सरकारने दिला आहे.

वीज केंद्रांना वेगाने कोळसा पुरविण्यासाठी रेल्वेने शुक्रवारी 42 पॅसेंजर गाड्या रद्द केल्या. तसेच, माल वाहतूक वाढवली आहे.देशातील बहुतांश राज्यांत उष्णतेची लाट आली आहे. अचानक विजेची मागणी वाढल्याने वीज निर्मिती केंद्रांमध्ये कोळशाचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी देशात अनेक ठिकाणी भारनियमनाचा पर्याय अवलंबिला जात आहे; पण यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय उद्योग व्यवसायांनादेखील मोठा आर्थिक फटका बसत आहे.

विजेच्या मागणीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे कोळशाची वाहतूक करणार्‍या रेल्वेगाड्यांच्या फेर्‍या वाढवल्या आहेत. पण याचा परिणाम आता प्रवाशांची वाहतूक करणार्‍या रेल्वे गाड्यांवर होत आहे. गेल्या काही आठवड्यांत दररोज सुमारे 16 मेल/एक्स्प्रेस आणि पॅसेंजर गाड्या रद्द कराव्या लागल्या.

देशभरातील वीज निर्मिती केंद्रांमध्ये कोळसा वाहतूक करण्यासाठी एकाच मार्गावर जादा गाड्या चालवाव्या लागत आहेत. रेल्वे मंत्रालयाने 24 मे पर्यंत पॅसेंजर गाड्यांच्या जवळपास 670 फेर्‍या रद्द करण्याची अधिसूचना दिली आहे. यामध्ये 500 हून अधिक फेर्‍या लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या आहेत.

महाराष्ट्रावरही संकट

महाराष्ट्रासह, उत्तर प्रदेश, राजस्तान, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, बिहार, झारखंड, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या 12 राज्यांना वीज संकटाचा सामना करावा लागत आहे. गेल्या आठवड्यात देशात 623 दशलक्ष युनिट वीज तुटवडा निर्माण झाला. महाराष्ट्रात 7 औष्णिक ऊर्जेवर आधारित वीज प्रकल्प आहेत. या प्रकल्पांना पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी दररोज सुमारे 1.45 लाख मेट्रिक टन कोळशाची आवश्यकता असते. गेल्या आठवड्यात केवळ 6.5 लाख मेट्रिक टन कोळसा शिल्लक होता. नाशिक आणि भुसावळ प्रकल्पात एक-दोन दिवसांचा कोळसा शिल्लक होता.

रशियातून होणारा गॅसचा पुरवठा थांबला आहे. पण सध्या औष्णिक वीज केंद्रात कोळशाचा दोन कोटी 10 लाख टन साठा आहे. तो दहा दिवसांसाठी पुरेसा आहे. कोल इंडियासह भारताकडे एकूण 30 लाख टन साठा आहे. हा 70 ते 80 दिवसांसाठीचा साठा आहे.

  • प्रल्हाद जोशी, केंद्रीय कोळसा मंत्री

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा