एकत्र कुटुंब पद्धतीसह पर्यावरणाचाही संदेश

भारतरत्न लता मंगेशकर साहित्यनगरी (उदगीर) : ग्राम संस्कृतीचे प्रतीक असलेली झोपडी, त्यात एकोप्याने राहणारे शेतकरी कुटुंब, अंगणातील धान्य दळण्याचे जाते, सूप, बाज, बैलगाडी, वैरण अशा वेगवेगळ्या अस्सल ग्रामीण वस्तू व साहित्यांमधून संमेलनात ग्रामदर्शन घडविण्यात आले. साहित्य रसिकांसह सर्वांनीच यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

साहित्य संमेलनाचा मुख्य मंडप व ग्रंथ प्रदर्शन यांच्या मध्यभागी साकारलेली ही ग्रामसंस्कृती वैशिष्ट्यपूर्ण ठरली. यात उदगीरमधील विविध शाळांनी सहभाग नोंदवला. उदगीर एसटी कॉलनीतील अक्षरनंदन प्राथमिक विद्यालयातील विध्यार्थ्यांनी या ग्रामजीवनात रंग भरले. शेतकरी, त्याची पत्नी, आई, वडील, आजोबा-आजी, भाऊ, बहीण अशा वेशभूषा साकारत मुलांनी एकत्र कुटुंब पद्धतीचा संदेश दिला. याशिवाय ’गांधीजींनी दिला संदेश…स्वच्छ ठेवा भारत देश..’, ’देशात आणू स्वच्छतेची क्रांती, तेव्हाच होईल प्रगती’, ’सफाई घरात, हेच औषध रोगात’, असे फलकही झोपडीभोवती झळकत होते. त्यातून स्वच्छता व पर्यावरणाचा संदेश देण्यात आला.

अक्षरनंदनचे मुख्याध्यापक शिवशंकर जिवणे म्हणाले, ही ’आजीची झोपडी’ आहे. यात सर्व कुटुंब परस्परांशी बांधले गेलेले आहे. सभोवतीचा परिसर, त्यातील घटक हेही या घट्ट नात्यात भर घालत आहेत, अशी संकल्पना आहे. उखळ, जाते, तसेच अन्य वस्तू येथे मुलांना पहायला मिळाल्या. अलीकडे ग्रामजीवनाशी निगडित वस्तू पहायला मिळत नाहीत. त्या तशा पाहायला मिळणे, मुलांच्या ज्ञानात भर घालतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.या उपक्रमात अक्षरनंदनचे एम. जी. बिरादार, अरुणा वाघमारे आदी शिक्षक व 10 विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

याखेरीज सुवर्णामाता देशमुख कन्या विद्यालयाच्या मुलींनीही जात्यावर दळण दळत व ओव्या म्हणत वातावरणात चैतन्य आणले. काचापाणी, सागरगोट्या यांसारखे खेळ त्यांनी रंगवले. विश्वंभर गव्हाणे, बाबूराव पाटील, दैवशाली टेंकाळे आदी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली 8 मुली यात सहभागी झाल्या.
तीन दिवसीय संमेलनात उदगीर परिसरातील विविध शाळांनी येथे भेट दिली, तसेच स्वच्छ, सुंदर व एकोपा राखणार्‍या ग्रामीण जीवनाचा संदेशही दिला. महात्मा गांधी यांच्या वेशभूषेतील कार्यकर्त्यानेही हजेरी लावत खेड्याकडे चला, या महात्मा गांधी यांच्या तत्त्वज्ञानाचा जागर केला.या उपक्रमाला संमेलनाचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागरळकर यांनी भेट देऊन शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा