सोनियांची घेतली भेट

नवी दिल्ली : राजस्तानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी गुरूवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीत पुढील वर्षी होणार्‍या राजस्तान विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली, असे वृत्त आहे. तसेच, पायलट यांनी मुख्यमंत्री पदाची इच्छादेखील व्यक्त केली असल्याचे समजते.

काँग्रेसने आगामी विधानसभा आणि 2024 मधील सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कंबर कसली आहे. निवडणूक व्यूहरचनाकार प्रशांत किशोर यांनी यासंदर्भात आराखडा केला असून ते काँग्रेस नेत्यांशी चर्चा करत आहेत.

दोनच दिवसांपूर्वी राजस्तानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची प्रशांत किशोर यांच्यासमवेत चर्चा झाली होती. या बैठकीत काँग्रेसचे अन्य महत्त्वाचे नेतेदेखील उपस्थित होते.

पायलट यांनी काल सोनिया यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. पंधरा दिवसांपूर्वी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी यांचीदेखील भेट घेतली होती.

पायलट यांची मुख्यमंत्री पदाची इच्छा लपून राहिलेली नाही. याच प्रश्‍नावरुन 2020 मध्ये त्यांनी उघड बंडखोरीदेखील केली होती. त्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री पदासह प्रदेशाध्यक्ष पद गमवावे लागले होते.

गेल्या दोन वर्षांत काँग्रेसमधून अनेक मोठे नेेते बाहेर पडले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर पायलट आणि सोनिया यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. ज्योतिरादित्य शिंदे, जितिन प्रसाद आणि आरपीएन सिंह सारखे नेते काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये सहभागी झाले आहेत.

पायलट यांनी मुख्यमंत्री पदाची इच्छा सोनिया गांधी यांच्याकडे बोलून दाखवली आहे. 2018 च्या विधानसभा निवडणुकीतील यशात पायलट यांचा मोठा हातभार होता. मात्र, यानंतरही त्यांना मुख्यमंत्री पदावर आरुढ होता आले नव्हते. त्यांच्याऐवजी ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांच्या गळी मुख्यमंत्री पदाची माळ पडली होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा