उपचारावर दीड कोटींचा खर्च!

मुंबई, (प्रतिनिधी) : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह राज्य सरकारमधील 18 मंत्र्यांनी गेल्या दोन वर्षांत खासगी रुग्णालयात घेतलेल्या उपचारावर सरकारी तिजोरीतून 1 कोटी 40 लाख खर्च करण्यात आले आहेत. माहिती अधिकारातून ही बाब पुढे आली असून, मंत्र्यांनाही सरकारी रुग्णालयावर विश्वास वाटत नाही का? असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.

नाशिकच्या पत्रकार दिप्ती राऊत यांनी माहितीच्या अधिकारात मिळवलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांत राजेश टोपेंसह 18 मंत्र्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले असल्याची बाब पुढे आली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे 9, काँग्रेसचे 6 आणि शिवसेनेचे 3 मंत्री आहेत. कोरोनाच्या काळात सर्वसामान्यांना सरकारी रुग्णालयात बेड मिळवण्यासाठी धावाधाव करावी लागत होती. त्यामुळे अनेकांना खासगी रुग्णालयात लाखो रुपये खर्च करावे लागले. मात्र, या काळात शक्य असतानाही अनेक मंत्र्यांनी सरकारी रुग्णालयांऐवजी खासगी रुग्णालयात उपचार घेतले व सरकारी तिजोरीमधून त्यांची बिले भरली गेली.

मंत्री आणि उपचाराचा खर्च

आरोग्य मंत्री राजेश टोपे : 34 लाख 40 हजार 930
ऊर्जा मंत्री नितीन राऊत : 17 लाख 63 हजार 879
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ : 14 लाख 56 हजार 604
महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार :12 लाख 56 हजार 748
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड : 11 लाख 76 हजार 278
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ : 9 लाख 3 हजार 401
पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार : 8 लाख 71 हजार 890
जलसंपदा मंत्री जयंत पाटील : 7 लाख 30 हजार 513
उद्योग मंत्री सुभाष देसाई : 6 लाख 97 हजार 293
परिवहन मंत्री अनिल परब : 6 लाख 79 हजार 606

सर्वच आमदारांना सुविधा : भुजबळ

केवळ मंत्र्यांनाच नव्हे तर सर्वच आमदारांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. तशी माहिती मागितली असती तर भाजपच्या आमदारांचीही नावे पुढे आली असती, अशी प्रतिक्रिया अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. तर आपण व्यक्‍तीशः खासगी रुग्णालयात दाखल नव्हतो, तर आपल्या आई रुग्णालयात होत्या व त्यांच्यावरील उपचाराचे हे बिल असल्याचा खुलासा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा