धार्मिक ध्रुवीकरण करण्याची भाजपची खेळी फसल्याचे ताज्या निकालांनी दाखवले. त्यावरून लोकसभेचे भाकीत कोणी करू नये. योग्य मुद्दे घेऊन जनतेसमोर गेले पाहिजे हे काँग्रेसला उमगले तरी पुष्कळ झाले.

पोट निवडणुकांचे निकाल किती गांभीर्याने घ्यावयाचे ते त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून असते. एरवी त्यांना फार महत्त्व नसते. मात्र अलीकडेच जाहीर झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्‍वभूमीवर ताज्या पोटनिवडणुकांकडे पाहावे लागेल. चार राज्यांत भारतीय जनता पक्षाने विजय मिळवल्याने सर्वत्र हाच पक्ष सतत विजय मिळवत राहणार असे चित्र पक्षातर्फे रंगवले जात आहे. त्याला ताज्या निकालांनी जोरदार तडाखा दिला आहे. चार राज्यांत पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकांत लोकसभेची एकच जागा आहे. बाकी विधानसभांच्या जागा आहेत. या पोटनिवडणुकीत भाजपच्या वाट्याला एकही जागा आली नाही. महाराष्ट्रात कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघात व छत्तीसगढमधील खैरागढमध्ये विजय मिळवून, जनता अजूनही काँग्रेसच्या पाठीशी असल्याचा संदेश पक्षाने दिला आहे. पश्‍चिम बंगालमध्ये ममतादीदींच्या तृणमूलची ताकद व लोकप्रियता अबाधित आहे हे सिद्ध झाले. बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला कमी लेखून चालणार नाही हेही दिसून आले. काहीसे अडगळीत गेलेल्या नामवंतांना या निवडणुकीने पुन्हा प्रकाशात आणले आहे. प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय पक्षांपेक्षा वरचढ ठरणार का? हा प्रश्‍नही या निकालांनी उपस्थित केला आहे.

काँग्रेसला दिलासा

पश्‍चिम बंगालमधील असनसोल लोकसभा मतदारसंघात पूर्वीचे अभिनेते व आताचे राजकीय नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी दणदणीत विजय मिळवला. सिन्हा आधी भाजपत होते. नाराज होऊन ते काँग्रेसमध्ये आले. गेल्या लोकसभा निवडणुकीत पाटण्यात त्यांचा पराभव झाला. त्यांना अगदी अलीकडे ममतादीदींनी आपल्या पक्षात ओढले. असनसोल मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला कधीच विजय मिळाला नव्हता, त्यामुळे त्यांच्यासाठी हा विजय महत्त्वाचा आहे. तो सिन्हा यांच्या वलयाचा आहे की तृणमूलचा आहे हे स्पष्ट होण्यास थोडा वेळ जाईल. मात्र, यामुळे तृणमूलचा लोकसभेतील आवाज अधिक मोठा होईल यात शंका नाही. बालीगुंज विधानसभा मतदारसंघात तृणमूलचेच बाबूल सुप्रियो जिंकले. बाबूल मूळचे गायक. ते भाजपतर्फे दोनदा असनसोलमधून लोकसभेत गेले. मंत्री झाले; पण गेल्या वर्षी त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली. ज्या तृणमूलच्या विरोधात ते लढत असत त्याच पक्षातर्फे आता ते जिंकले आहेत. या मतदारसंघात भाजप चौथ्या स्थानावर राहिला. छत्तीसगढमध्ये खैरागढ मतदारसंघात यशोदा वर्मा जिंकल्याने 90 जागांच्या विधानसभेत काँग्रेसच्या 71 जागा झाल्या आहेत. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेसच्या जयश्री जाधव जिंकल्या. तेथील दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या त्या पत्नी आहेत. त्यांचा विजय जवळपास नक्की होता. या दोन विजयांमुळे काँग्रेसला किरकोळ दिलासा मिळाला. मात्र बिहार आणि बंगालमध्ये त्यांंची स्थिती दयनीय आहे हेही लक्षात घेतले पाहिजे. बिहारच्या बोकाहा मतदारसंघात राष्ट्रीय जनता दलाचे अमर पासवान जिंकले. विकासशील इन्सान पक्षाचे मुसाफिर पासवान यांचे ते चिरंजीव. मुसाफिरही आमदार होते. त्यांच्या निधनामुळे ही निवडणूक झाली. हा पक्ष भाजपचा मित्रपक्ष होता; पण त्याचे संस्थापक मुकेश सहानी यांनी उत्तर प्रदेशातील निवडणुकीत भाजपवर टीका केल्याने दोघांत दुरावा निर्माण झाला. अमर यांना विजयी करून लालू यांनी भाजपला जागा दाखवून दिली. या निवडणुकांमध्ये भाजप स्पर्धेत नाही असे दिसत होते. पश्‍चिम बंगाल व महाराष्ट्रात राजकीय नेत्यांच्या मागे केंद्र सरकारने तपास संस्थांच्या चौकशीचे शुक्लकाष्ठ लावले आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम झाला असे म्हणता येते. हिंदुत्वाच्या घोषाचाही प्रभाव पडला नाही. भाजपचा पराभव करता येतो हे गेल्या वर्षी तामिळनाडू, केरळ, पश्‍चिम बंगालमधील निवडणुकांनी दाखवून दिले. त्यास ताज्या निकालांनी पुष्टी दिली. काँग्रेसला देशभरातील आपले स्थान बळकट करण्यावर लक्ष दिले पाहिजे हा संदेशही या निकालांनी दिला आहे. तसेच, काँग्रेसला वगळून विरोधकांचे ऐक्य होणार नाही हे ममतादीदी यांना उमगेल. विरोधी पक्ष व काँग्रेसला जागे करणारे हे निकाल आहेत हे त्यांचे वैशिष्ट्य.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा