अव्वाच्या सव्वा दरवाढीने प्रवाशांच्या खिशावर ताण
पुणे : दीर्घ कालावधीपासून एकीकडे एसटी कर्मचार्‍यांचा संप सुरू आहे, तर दुसरीकडे लग्नाच्या तारखा, सुट्ट्या आदींमुळे प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे खासगी बस चालकांनी तिकीट दरात अव्वाच्या सव्वा वाढ केली आहे. अनेक मार्गावरील तिकीट दर प्रवाशांच्या आवाक्याबाहेर आहेत. तर काही मार्गावरील खासगी बसचे तिकीट दर विमानाच्या तिकीटा इतके आहेत. त्यामुळे तिकीटाचे आकडे पाहता खासगी बसचा प्रवास ‘नको रे बाबा’ म्हणण्याची वेळ आली आहे.
पुण्यातून विदर्भात जाण्यासाठी आराम बसचे तिकीट 2000 पर्यंत पोहचले आहे. तर मराठवाड्यात जाण्यासाठी 1500 मोजावे लागत आहेत. खानदेशात जाण्यासाठी तिकीट दर 1300 पर्यंत पोहचले आहेत. विदर्भातून रोज सुमारे 100 खासगी बस पुण्यात तसेच जातात. मराठवाड्यातील खासगी बसची संख्या 100 पेक्षा अधिक आहे. त्यातून हजारो प्रवासी प्रवास करतात. इतर वेळी यातील काही प्रवासी एसटी बसने प्रवास करतात. मात्र एसटी कर्मचार्‍यांचा संप सुरू असल्याने तिकीटासाठी अधिकचे पैसे खर्च करण्याची क्षमता नसतानाही खासगी बसने प्रवास करावा लागत आहे.
एसटी संपाच्या आधी विदर्भात जाण्यासाठी 1000 ते 1200 इतके खासगी बसचे तिकीट दर होते, तर मराठवाड्यात जाण्यासाठी 600 ते 800 रूपये तिकीट होते. मात्र एसटी संपामुळे प्रवाशांची गरज लक्षात घेवून खासगी बस चालकांनी विदर्भ, मराठवाड्यातील बहुतांश मार्गावर तिकीट दरात अव्वाच्या स्वा वाढ केली आहे. त्यामुळे वाढलेल्या तिकीट दराचा बोजा प्रवाशांच्या खिशावर पडत आहे. त्यातच उन्हाळी सुट्या तसेच पर्यटनासाठी बाहेर गावी निघालेल्या प्रवाशांमुळे दिवसेंदिवस खासगी बसचे तिकीट दर वाढतच चालले आहेत.
पुणे हे सर्वार्थांने महत्त्वाचे शहर आहेत. त्यामुळे विदर्भ, मराठवाड्यासह अन्य भागातून लोक शिक्षण, नोकरी, संशोधन, व्यवसाय, रोजगारानिमित्त पुण्यात येतात. विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्या आहेत. विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. या महिन्यात लग्नाच्या तारखा असल्याने ये-जा करणार्‍यांची संख्या वाढली आहे. मात्र प्रवाशांच्या तुलनेत राज्य परिवहन महामंडळाच्या बस अपुर्‍या पडत आहेत. त्यामुळे नाईलाजास्तव प्रवाशांना अधिकचे पैसे मोजून खासगी बसने प्रवास करावा लागत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा