पुणे : पुणे मेट्रोच्या पीसीएमसी ते स्वारगेट या मार्गिकेमध्ये शिवाजीनगर ते स्वारगेट हा मार्ग भुयारी आहे. या मार्गिकेची लांबी 6 किमी असून त्यामध्ये शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट, बुधवार पेठ, मंडई, स्वारगेट ही पाच भूमिगत स्थानके आहेत. कृषी महाविद्यालय ते स्वारगेट या भुयारी मार्गाची लांबी 6 किलोमीटर असून जाण्यासाठी व येण्यासाठी असे दोन टनेल बांधण्यात येत आहे. या दोन टनेल पैकी एका बाजूचे टनेल खोदण्याचे काम शुक्रवारी पूर्ण झाले आहे.

एकूण 12 किमी टनेल पैकी 10.8 किमी (90 % ) टनेलचे काम पूर्ण झाले आहे. शुक्रवारी स्वारगेटवरून निघालेले पवना नावाचे टनेल बोरींग मशीन बुधवार पेठ येथील भूमिगत स्थानकात पोहोचले आणि ब्रेक थ्रू साधला गेला आहे. स्वारगेटमधून निघालेले चवथे टनेल बोरिंग मशीन मंडई स्थानकाजवळ असून लवकरच ते उर्वरित 1.2 किमीचा बोगदा पूर्ण करून बुधवार पेठ स्थानकाजवळ मार्च 2022 अखेरीस पोहोचेल. आत्तापर्यंत स्वारगेट स्थानकाचे 45 टक्के , मंडई स्थानकाचे 20 टक्के, बुधवार पेठ स्थानकाचे 40 टक्के, सिव्हिल कोर्ट स्थानकाचे 75 टक्के आणि शिवाजीनगर स्थानकाचे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. भुयारी टनेलमध्ये मेट्रोसाठी आवश्यक असणार्‍या विद्युत वाहक तारा जोडण्याचेची कामे सुरू झाली आहेत. सिग्नलिंग आणि कम्युनिकेशन संबंधित कामेदेखील सुरू आहेत. ट्रॅक टाकण्यासंबंधीची प्राथमिक कामे देखील सुरू आहेत. महामेट्रोचे डिसेंबर 2022 मध्ये भुयारी मार्गाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे.

या प्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी म्हटले आहे, की भुयारी मार्गाचे काम अत्यंत आवाहनात्मक असून सर्व पुणेकर नागरिक आणि सर्व शासकीय संस्थांच्या पाठिंब्यामुळेच 90 टक्के टनेलचे काम वेळेत पूर्ण करू शकलो आहोत. आज पवना टीबीएम मशीनद्वारे बुधवार पेठ येथे ब्रेक थ्रू साधला गेला आणि एका बाजूचा टनेल खोदण्याचे काम पुर्ण झाले आहे. लवकरच संपूर्ण टनेलचे काम पूर्ण होईल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा