नवी दिल्ली : जागतिक कांस्यपदक विजेता लक्ष्य सेन आणि पुनरागमन करणारा एचएस प्रणॉय यांनी दिमाखदार विजयासह इंडिया खुल्या बॅडिमटन स्पर्धेत आशा वाढविल्या आहेत. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीनेही पुरुष दुहेरीत विजयी अभियान सुरू केले आहे.

पुरुष एकेरीत जागतिक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मुसंडी मारणार्‍या प्रणॉयने स्पेनच्या पाब्लो एबियनला 21-14, 21-7 असे नामोहरम केले. प्रणॉयचा दुसर्‍या फेरीत मिथुन मंजूनाथशी सामना होणार आहे. मंजूनाथने फ्रान्सच्या अरनॉड मेर्कलेवर 21-16, 15-21, 21-10 असा रोमहर्षक लढतीत विजय मिळवला. लक्ष्यने इजिप्तच्या अदहाम हातीम ईलगामालचा 21-15, 21-7 असा पराभव केला. पुरुष दुहेरीत सात्त्विक-चिराग जोडीने चिराग अरोरा आणि रवी जोडीला 21-14, 21-10 असे नामोहरम केले. महिला दुहेरीत राष्ट्रकुल कांस्यपदक विजेत्या अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी या द्वितीय मानांकित जोडीने जनानी अनंतकुमार आणि दिव्या आर. बालसुब्रह्मण्यम जोडीला 21-7, 19-21, 21-13 असे पराभूत केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा