धुक्यामुळे अपघात; जीवितहानी नाही

भोर, (प्रतिनिधी) : भोर महाड मार्गावर पहाटेच्या धुक्यामुळे मोटार नीरा-देवघर धरणाच्या बाजूला डोंगर उतारावर सुमारे पन्नास फूट खाली कोसळली. शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या दरम्यान वारवंड, शिरगावच्या हद्दीत ही दुर्घटना घडली. प्रसंगावधान राखून प्रवासी सुखरूप मोटारीमधून बाहेर पडले. ‘काळ आला पण वेळ आली नाही’ या म्हणीचा प्रत्यय प्रवाशांना आला.

एक प्रवासी किरकोळ जखमी झाला. मोटारीचे बरेच नुकसान झाले आहे. महेश प्रदीप गोरे, अनिल प्रदीप गोरे, सुरेश बाबाजी गोरे, प्रशांत गोरे (रा. चिपळूण) यांचा पुण्यामध्ये व्यवसाय आहे. संक्रातीनिमित्त देवदर्शनासाठी हे सर्व गावी निघाले होते. या मार्गावर काही ठिकाणी रस्ता दुरुस्तीची कामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी कठडे नाहीत. तशातच पहाटेपासून सकाळी आठ वाजेपर्यंत दाट धुक्यामुळे दिव्यांच्या उजेडातसुद्धा समोरचे स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे चालकाचा अंदाज चुकल्यामुळे मोटार पलट्या खात खाली गेली. महामार्ग पोलीस उपनिरीक्षक विनायक कापसे, हवालदार रामदास केचे, एच. सी. नवले यांनी क्रेनच्या साहाय्याने मोटार वर काढली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा