मुंबई, (प्रतिनिधी) : पंतप्रधानांनी बोलावलेल्या बैठकीला प्रकृतीच्या कारणामुळे ऑनलाईनही उपस्थित राहू न शकलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज महापालिकेच्या कार्यक्रमाला कसे काय उपस्थित राहिले ? असा सवाल भाजपाने उपस्थित केला आहे. मुख्यमंत्र्यांची प्रकृती खरेच बरी नसेल तर त्यांनी आपला कार्यभार अन्य कोणाकडे तरी सोपवावा, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी केली. तर मुख्यमंत्रीच सर्व निर्णय घेत असून, त्यांच्या प्रकृतीची चिंता इतरांनी करू नये, असे प्रत्त्युत्तर आघाडीच्या नेत्यांकडून देण्यात आले.

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी 30 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची ऑनलाइन आढावा बैठक घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहू शकले नव्हते. त्यांच्याऐवजी आरोग्यमंत्री राजेश टोपे पंतप्रधानांच्या बैठकीला उपस्थित होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी काल मुंबई महापालिकेच्या वॉट्स एप चॅटबॉटच्या कार्यक्रमाला मात्र ऑनलाइन हजेरी लावली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. प्रकृती अस्वास्थामुळे पंतप्रधानांच्या बैठकीस उपस्थित राहू न शकलेले मुख्यमंत्री दुसर्‍या दिवशी दुसर्‍या कार्यक्रमात दिसतात. जाणीवपूर्वक ते पंतप्रधानांच्या बैठकीला गैरहजर राहिले, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा