मेलबर्न : आगामी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेची कार्यक्रमपत्रिका गुरुवारी जाहीर करण्यात आली. यात गतविजेत्या नोव्हाक जोकोव्हिचचा समावेश असून पहिल्या फेरीत त्याच्यापुढे सर्बियन सहकारी मोओमिर केस्मानोव्हिचचे आव्हान असेल. मात्र, अजूनही त्याच्या या स्पर्धेतील सहभागाबाबत संभ्रम कायम आहे. लसीकरणात वैद्यकीय सवलत मिळाल्यावर मागील आठवडयात मेलबर्नमध्ये दाखल झालेल्या जोकोव्हिचचा व्हिसा ऑस्ट्रेलियन सरकारने रद्द केला. मात्र, जोकोव्हिचने न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयाने सरकारचा निर्णय मागे घेतला. परंतु परकीय नागरिकविषयक खात्याच्या मंत्र्यांना (इमिग्रेशन मिनिस्टर) जोकोव्हिचचा व्हिसा पुन्हा रद्द करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयावर जोकोव्हिचचे ऑस्ट्रेलियन स्पर्धेतील भवितव्य अवलंबून आहे.

ऑस्ट्रेलियन खुली ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा सुरू होण्यासाठी एका आठवडयाहून कमी अवधी शिल्लक असतानाही नोव्हाक जोकोव्हिचच्या समावेशाबाबत अनिश्चितता कायम होती. मात्र, आता वर्षातील पहिल्या ग्रँडस्लॅम ऑस्ट्रेलियन ओपनचा मुख्य ड्रॉ जाहीर झाला आहे. जगातील नंबर वन खेळाडू आणि नऊ वेळा ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन नोव्हाक जोकोव्हिचलाही त्यात स्थान मिळाले आहे.यासोबतच प्रतिष्ठेच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत सर्बियन जोकोव्हिचा सहभागही निश्चित झाला आहे. जोकोव्हिच आपल्या पहिल्या सामन्यात मिओमिर केकमानोविचशी भिडणार आहे.

नोव्हाक जोकोव्हिचचा व्हिसा रद्द झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपन-2022 मधील त्याच्या सहभागाबाबत शंका निर्माण झाली होती. मात्र जोकोव्हिचने तेथील कोर्टात ऑस्ट्रेलियन सरकारविरुद्ध लढा दिला आणि केस जिंकण्यात यश मिळवले. मेलबर्न कोर्टात सोमवारी झालेल्या सुनावणीत खंडपीठाने जोकोव्हिचचा व्हिसा रद्द करण्याचा ऑस्ट्रेलियन सरकारचा निर्णय चुकीचा ठरवला. यानंतर न्यायालयाने ऑस्ट्रेलियन सरकारला नोव्हाक जोकोव्हिचच्या पासपोर्टसह सर्व वस्तू तातडीने परत करण्याचे आदेश दिले. व्हिसा रद्द झाल्यानंतर जोकोविच चार दिवस इमिग्रेशन विभागाच्या हॉटेलमध्ये थांबला होता. जोकोव्हिचवर करोनाची लस न घेतल्याचा आरोप होता, तर ऑस्ट्रेलियात याबाबत कडक कायदे आहेत.

विशेष म्हणजे, गतवर्षी डिसेंबर महिन्यात करोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आल्यानंतरही विलगीकरण करण्याऐवजी एका वृत्तपत्राला मुलाखत देण्यासाठी घराबाहेर पडणे महागात पडले, असा खुलासा सर्बियाचा अव्वल टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचने बुधवारी केला होता. कठीण कालखंडात तुम्ही सर्वानी पाठिंबा दिल्यामुळे मी आभारी आहे. परंतु डिसेंबरमधील माझ्या कृत्यांविषयी चुकीचे वृत्त सगळीकडे पसरत आहे. 14 डिसेंबरला एका बास्केटबॉल सामन्यासाठी मी हजेरी लावली. तेथून आल्यावर 16 तारखेला मी जलद प्रतिजन चाचणी केली. त्याचा निकाल नकारात्मक आला,’’ असे जोकोव्हिचने निवेदनात नमूद केले. ‘‘त्याच दिवशी मी आरटी-पीसीआर चाचणीही केली. 17 तारखेला रात्री त्या चाचणीचा सकारात्मक निकाल आला. परंतु एका प्रतिष्ठित वृत्तपत्राला शब्द दिल्यामुळे त्या कामानिमित्त 18 डिसेंबरला घराबाहेर पडलो. तेव्हा वेळीच विलगीकरण केले असते, तर माझ्या ऑस्ट्रेलियातील प्रवेशावर इतका वाद उद्भवला नसता,’’ असेही जोकोव्हिचने सांगितले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा