लखनऊ: ज्येष्ठ पत्रकार कमाल खान यांचे आज लखनऊ येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने टीव्ही पत्रकारितेतील एक प्रसिद्ध चेहरा काळाच्या पडद्याआड गेला असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह काही मान्यवरांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

कमाल खान हे गेल्या ३० वर्षांपासून एनडीटीव्हीत होते. सध्या ते लखनऊ ब्युरोचे प्रमुख होते. अगदी कालच त्यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीवर विशेष रिपोर्टिंग केले होते. त्यानंतर आज सकाळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले पण त्याआधीच त्यांचे निधन झाले होते. कमाल खान यांच्या पश्चात पत्नी रुची कुमार आणि मुलगा अमन असा परिवार आहे. रुची कुमार यासुद्धा पत्रकार आहेत.

कमाल खान यांच्या निधनाने टीव्ही पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली असून राजकीय क्षेत्रातूनही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कमाल खान यांना उत्कृष्ट पत्रकारितेसाठी रामनाथ गोयंका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना गणेश शंकर विद्यार्थी पुरस्कारही मिळाला होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा