लखनौ : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांचा विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर भाजपच्या मंत्र्यांना अचानक गळती लागल्याचे चित्र आहे. ऐन विधानसभेच्या तोंडावर योगी सरकारमधील तिसर्‍या मंत्र्यानेही गुरुवारी राजीनामा दिल्याने पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. तीन दिवसांत तीन मंत्री आणि आठ आमदारांनी भाजपला रामराम ठोकला असून, भाजपसाठी ही चिंतेची बाब समजली जात आहे.

उत्तर प्रदेशचे आयुष आणि आरोग्य राज्यमंत्री डॉ. धर्मसिंह सैनी यांनीही काल राजीनामा दिला आहे. ज्या अपक्षेने दलित, मागास, शेतकरी, बेरोजगार युवक आणि लहान-सहान व्यापारी व छोटे उद्योजक यांनी राज्यात एकत्रितपणे भाजपचे सरकार बनविण्याचे काम केले. मात्र, या सर्वांची आणि त्यांच्या लोकप्रतिनिधींची सातत्याने उपेक्षा होत आहे, त्यामुळेच आपण मंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचे सैनी यांनी म्हटले आहे. सैनी यांनी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे राजीनामा दिला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनेक आमदार भाजप सोडत असल्याची टीका केली. तसेच शिवसेना नेते संजय राऊत यांनी शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली.

दरम्यान, धर्म सिंह सैनी यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेऊन चर्चा केली. यामुळे ते समाजवादी पक्षात प्रवेश करू शकतात, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून प्रचारालाही सुरुवात झाली आहे. असे असतानाच भाजपला आतापर्यंत 14 नेत्यांनी रामराम केला आहे. तत्पूर्वी, बुधवारी दारा सिंह चौहान आणि मंगळवारी स्वामी प्रसाद मौर्य यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला होता, त्यानंतर त्यांनीही अखिलेश यादव यांच्याशी चर्चा करून पक्षप्रवेश केला आहे.

आतापर्यंत भाजपमधून फारकत घेतलेल्या नेत्यांमध्ये स्वामी प्रसाद मौर्य, भगवती सागर, रोशनलाल वर्मा, विनय शाक्य, अवतार सिंह भाड़ाना, दारा सिंह चौहान, बृजेश प्रजापति, मुकेश वर्मा, राकेश राठौर, जय चौबे, माधुरी वर्मा, आर के शर्मा, बाला अवस्थी, धर्म सिंह सैनी आदींचा समावेश आहे.

जातीय समीकरणाला महत्त्व

उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये जातीय समीकरणाला अतिशय महत्त्व आहे. येथे ओबीसी समाजाचे अनेक मतदारसंघांमध्ये वर्चस्व आहे, तर काही मतदारसंघांमध्ये ओबीसी मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे स्वामी प्रसाद मौर्य व दारा सिंह चौहान या बलाढ्य ओबीसी नेत्यांच्या जाण्याने भाजपला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा