पुणे : संक्रांतीसाठी बाजारात गावरान बोरांची आवक सुरू झाली आहे. यंदा अवकाळी पावसामुळे सोलापूर, नगर जिल्ह्यातील बोरांची लागवड कमी झाली आहे. परिणामी बोरांच्या दरात वाढ झाली आहे. अशी माहिती व्यापारी पांडुरंग सुपेकर यांनी सांगितली.

सुपेकर म्हणाले, संक्रांतीच्या पूजेसाठी गृहिणींकडून गावरान बोरांना मोठी मागणी असते. गावरान बोरांची लागवड सोलापूर, तसेच नगर जिल्ह्यातील शेतकरी करतात. गावरान बोरांसह, पल, चेकनट बोरांची लागवड सोलापूर, नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर केली जाते. गावरान बोरे आंबट गोड असतात, तसेच आकाराने लहान असतात. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे बोरांच्या लागवडीवर परिणाम झाला. वातावरणातील बदलाचा बोरांच्या लागवडीवर परिणाम झाला. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा बोरांची आवक कमी झाली आहे.

व्यापारी माऊली आंबेकर म्हणाले, दरवर्षी संक्रांतीला गावरान बोरांची बाजारात साधारपणपणे दहा टन एवढी आवक होते. मात्र यावेळी 5 टनापर्यंतच बोराची आवक होत आहे. बोरांना मागणी चांगली असून, आवक अपुरी होत आहे. पुणे शहर, जिल्हा, तसेच पिंपरीतील किरकोळ खरेदीदारांनी बोरांची खरेदी केली. बाजारात सध्या गावरान बोरांचा तुटवडा जाणवत असल्याने दर वाढले आहेत.

हैदराबादमधील व्यापार्‍यांकडून चेकनट, पल बोरांना मागणी चांगली आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी हैदराबादमधील व्यापार्‍यांना थेट पल, चेकनेट बोरांची विक्री करतात.

किरकोळ बाजारात बोरांचे दर (रुपये किलो)
गावरान बोरे 80 ते 100
चेकनट बोरे 120 ते 150
पल बोरे 120 ते 150

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा