केपटाऊन : भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने दमदार फलंदाजीचा नजराणा पेश करत दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या दुसर्‍या डावात शतक ठोकले. भारतीय संघ अडचणीत सापडला असताना पंत धावून आला आणि त्याने नाबाद 100 धावा ठोकल्या. त्याच्या कामगिरीमुळे आफ्रिकेला दुसर्‍या डावात 212 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. पंतच्या या खेळीनंतर भारताच्या एकदिवसाच्या आणि टी-20 संघाचा कप्तान रोहित शर्माने कोड्यात टाकणारे ट्वीट केले आहे.
पंतने शतक ठोकताच रोहितने इमोजी असलेले ट्वीट पोस्ट केले. या ट्विटवरून पंतने टीकाकारांची तोंडे बंद केली, असा अर्थ लावला जात आहे. आफ्रिका दौर्‍यावर ऋषभ पंत अपयशी ठरत होता. पहिल्या दोन कसोटीत त्याच्या बॅटमधून जास्त धावा निघाल्या नाहीत. कसोटीमधील त्याच्या फलंदाजीच्या तंत्राबद्दलही शंका उपस्थित करण्यात येत होत्या. आता त्याने झुंजार आणि आपला नैसर्गिक खेळ दाखवत सर्वांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. याच अनुषंगाने रोहितने त्याचे कौतुक करत ट्वीट केले. पंतने 6 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 100 धावांची खेळी केली. मधल्या फळीत त्याने विराटसोबत 92 धावांची मौल्यवान भागीदारी रचली. रोहित शर्मा दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी आणि वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. तो आणि अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजा यांनी दुखापतीतून सावरण्यासाठी एनसीएसमध्ये तयारी सुरू केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा