केपटाऊन : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेली तिसरी आणि निर्णायक कसोटी अत्यंत महत्वाच्या वळणावर पोहोचली आहे. या सामन्याचा तिसरा दिवस आहे. भारताचा दुसरा डाव काल 198 धावांवर संपुष्टात आला आणि दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 212 धावांचे आव्हान मिळाले. भारताकडून ऋषभ पंतने झुंजार आणि नाबाद शतकी खेळी केली. मधल्या फळीत त्याने विराटसोबत 92 धावांची मौल्यवान भागीदारी रचली. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्को जानसेनने 4 बळी टिपत भारताला अपेक्षेनुसार जास्त धावा करू दिल्या नाहीत.

भारताच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या दुसर्‍या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर एडन मार्करामला स्वस्तात तंबूत धाडण्यात शमीला यश आले. मार्करामने 16 धावा केल्या. त्यानंतर फॉर्मात असलेल्या कीगन पीटरसनने डीन एल्गनसोबत संघाची धावसंख्या वाढवली. या दोघांनी आफ्रिकेचे अर्धशतक पूर्ण केले. भारताचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल दुसर्‍या डावातही अपयशी ठरला. वेगवान गोलंदाज जानसेनने त्याला 10 धावांवर मार्करामकरवी झेलबाद केले. तर मयंक अग्रवाल (7) धावांवर कगिसो रबाडाचा बळी ठरला. त्यानंतर कप्तान विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी संघाला अर्धशतक गाठून दिले. त्यानंतर जानसेनने पुजाराला जास्त वेळ टिकून दिले नाही. त्याने पुजाराला वैयक्तिक 9 धावांवर मार्करामकरवी झेलबाद केले. त्यानंतर अजिंक्य रहाणे मैदानात आला. परंतु तो सुद्धा पुन्हा अपयशी ठरला.

रबाडाने रहाणेला (1) बाद केले. रहाणेनंतर विराटची साथ देण्यासाठी ऋषभ पंत मैदानात आला. त्याने कोणताही दबाव न घेता मुक्तपणे फलंदाजी केली. विराट संयमी तर पंत आक्रमक खेळला. जानसेनला फटका खेळत त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे पहिले अर्धशतक फलकावर लावले. शतकी भागीदारीला काही धावा शिल्लक असताना एनगिडीने विराटला तंबूचा मार्ग दाखवला. विराटने 29 धावांचे योगदान दिले. 152 धावांवर भारताचे 5 गडी तंबूत परतले. त्यानंतर ऋषभ पंतने किल्ला लढवला. एका बाजूने फलंदाज बाद होत असताना त्याने संघाची आघाडी दोनशेपार पोहोचवली. अश्विन, शार्दुल ठाकूर, उमेश यादव आणि मोहम्मद शमी यांना आफ्रिकेच्या गोलंदाजांनी लवकर तंबूत धाडले. 9 गडी बाद झाले असताना ऋषभने आपले शतक पूर्ण केले. जानसेनने जसप्रीत बुमराहला झेलबाद करत भारताचा डाव 67.3 षटकात 198 धावांवर संपुष्टात आणला. भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 212 धावांचे आव्हान दिले. पंतने 6 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 100 धावांची खेळी केली. तर आफ्रिकेकडून जानसेनने सर्वाधिक 4 बळी घेतले. रबाडा आणि एनगिडी यांना प्रत्येकी 3 बळी मिळाले.

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेचा कप्तान डीन एल्गरला (3) लवकर तंबूत पाठवत भारताला पहिले यश मिळवून दिले. पहिल्या दिवसअखेर एडन मार्कराम आणि नाईट वॉचमन केशव महाराज नाबाद होते. दुसर्‍या दिवसाच्या खेळाला सुरुवात होताच बुमराहने सुरेख पद्धतीने मार्करामचा (8) त्रिफळा उडवला. संघाचा अर्धशतकी पल्ला गाठण्यापूर्वी केशव महाराजही (25) उमेश यादवच्या गोलंदाजीवर तंबूत परतला. त्यानंतर कीगन पीटरसन आणि रुसी व्हॅन डर ड्यूसेन यांनी संघाला सावरलं. या दोघांनी संयमी भागीदारी रचत संघाचे शतक फलकावर लावले. उमेश यादवने ड्यूसेनला (21) बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर आलेल्या टेंबा बावुमाने पीटरसनला थोडी साथ दिली. पीटरसनने आपले अर्धशतक पूर्ण करत एका बाजूला किल्ला लढवला. वेगवान गोलंदाज शमीने आधी बावुमाला आणि त्यानंतर काइल वेरेनला बाद करत आफ्रिकेला अजून संकटात टाकले. 159 धावावर यजमानांनी 6 फलंदाज गमावले. तर बुमराहने जानसेनची दांडी गूल करत आफ्रिकेला सातवा धक्का दिला. बुमराहने ड्यूसेनला पुजारावकरवी झेलबाद करत आफ्रिकेची आशा संपुष्टात आणली. ड्युसेनने 9 चौकारांसह 72 धावांची खेळी केली. त्यानंतर बुमराहने एनगिडीला बाद करत दक्षिण आफ्रिकेचा डाव 76.4 षटकात 210 धावांवर संपुष्टात आणला. बुमराहने 42 धावांत 5 बळी घेतले. तर शमी आणि उमेश यादवला प्रत्येकी 2 बळी मिळाले.

विराट कोहलीने भारतीय संघात पुनरागमन करत नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मयंक अग्रवाल आणि केएल राहुल यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. भारताचं अर्धशतक पूर्ण होण्यापूर्वी हे दोघे तंबूत परतले. डुआन ऑलिव्हियर ने राहुलला (12) तर कगिसो रबाडाने एडन मार्करामला (15) झेलबाद केले. लंचपर्यंत विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी भारताचा डाव सावरला. लंचनंतर भारताने शतक पूर्ण केले पण डाव गडबडला. चांगल्या लयीत खेळणार्‍या पुजाराला वेगवान गोलंदाज मार्को जानसेनने झेलबाद केले. त्यानंतर आलेला अजिंक्य रहाणे रबाडाचा बळी ठरला. पुजाराने 7 चौकारांसह 43 तर रहाणेने 9 धावा केल्या.

चहापानापर्यंत भारताने 54 षटकात 4 बाद 141 धावा केल्या. चहापानानंतर भारताने पंतच्या रुपात आपला पाचला फलंदाज गमावला. जानसेनने त्याला बाद केले. दरम्यान विराटने संयमी अर्धशतक फलकावर लावले. 167 धावांत भारताने 5 फलंदाज बाद झाले. त्यानंतर भारताचे एकापाठोपाठ एक फलंदाज बाद होत राहिले. विराटने आक्रमक पवित्रा धारण करत झटपट धावा जोत संघाची धावसंख्या दोनशेपार पोहोचवली. तो आज शतकाचा दुष्काळ संपवणार असे वाटत असताना बाद झाला. ऑफ स्टम्पबाहेरील चेंडूवर विराटला रबाडाने तंबूत धाडले. विराटने 201 चेंडूंचा सामना करत 12 चौकार आणि एक षटकारासह 79 धावा केल्या. विराट बाद झाल्यानंतर आफ्रिकेने भारताचा पहिला डाव लवकर संपुष्टात आणला. पहिल्या डावात भारताने 77.3 षटकात सर्वबाद 223 धावा केल्या. आफ्रिकेकडून रबाडाने 4, जानसेनने 3 बळी घेतले. लुंगी एनगिडी, डुआन ऑलिव्हियर आणि केशव महाराज यांना प्रत्येकी एक बळी मिळाला.

संक्षिप्त धावफलक आफ्रिका दुसरा डाव : मार्कराम 16, एल्गर 30, केगीन पीटरसन 48, एकूण : 29.4 षटकांत 101/2
भारत दुसरा डाव : पंत 100, कोहली 29, के.एल राहुल 10, मयांक अगरवाल 7, पुजारा 9, आश्विन 7 एकूण 67.3 षटकांत 198/10

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा