राज ठाकरे यांचा राज्य सरकारला इशारा

मुंबई : महाराष्ट्रातील दुकानांवरील पाट्या मराठीतच असणे बंधनकारक आहे, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. सरसकट सर्व दुकानांच्या पाट्या मराठी भाषेत असतील, अशी सुधारणा आता या संदर्भातील कायद्यात केली जाणार असून या प्रस्तावाला बुधवारी राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्यानंतर या निर्णयाचे श्रेय घेण्यावरून राजकारण सुरू झाले आहे. याचे श्रेय फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांचे आहे. ते लाटण्याचा आचरटपणा कुणीही करू नये, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला.

राज ठाकरे यांनी यासंदर्भात एक पत्रक काढले असून त्यात राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. महाराष्ट्रात दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात यासाठी खरेतर आंदोलन करावे लागूच नये; परंतु 2008, 2009 मध्ये पाट्या मराठीतच असाव्यात म्हणून मनसेच्या सैनिकांनी महाराष्ट्र जागवला, आंदोलने केली, शेकडोंनी खटले अंगावर घेतले आणि शिक्षा भोगल्या. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयाचे श्रेय फक्त आणि फक्त मनसेचे आहे. बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करू नये, असे त्यांनी पत्रकात लिहिले आहे.मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाला व्यापार संघटनांनी विरोध केला आहे. हा निर्णय दुकान मालकांच्या विरोधात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा