वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : वर्धा जिल्ह्यातील आर्वीमधील कदम रुग्णालयात १३ वर्षांच्या मुलीच्या बेकायदा गर्भपाता प्रकरणी कारवाई सुरू असतानाच रुग्णालयातील धक्कादायक, घृणास्पद प्रकार समोर आला आहे. रुग्णालय परिसरातील एका गोबर गॅसच्या टाकीत अर्भकांच्या हाडांचे ६५ अवशेष सापडले आहेत. या रुग्णालयाच्या संचालिका डॉ. रेखा कदम यांना पोलिसांनी गर्भपात प्रकरणी आधीच अटक केली आहे. रुग्णालयातील परिचारिका संगीता काळे यांनाही अटक करण्यात आली.

या प्रकरणासंदर्भात वर्ध्याचे पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले की, वर्धा गर्भपात आणि अर्भक अवशेष प्रकरणी आरोपी डॉक्टरला ताब्यात घेण्यात आले असून त्याचा पीसीआर घेण्यात आला आहे. ज्यामध्ये त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. या आरोपी डॉक्टरच्या रुग्णालयात सोनोग्राफी मशीन सापडले आहे. संबंधित डॉक्टरच्या सासूबाई स्वत: एक महिला बालरोग तज्ज्ञ आहेत. त्यांना अटक झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असतानाच 12 जानेवारीला खबर्‍यांकडून माहिती मिळाली की, आरोपी डॉक्टरांच्या घरामागील घरगुती गोबर गॅसच्या टाकीमध्ये कोणतेही कायदेशीर नियम न पाळता अर्भकांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावण्यात आली होती. त्यानुसार खोदकाम केले असताना अर्भकांचे ६५ अवशेष सापडले. यामध्ये ११ कवट्या आणि ५४ हाडांचा समावेश आहे. गर्भपातची नोंद असलेले रजिस्टर जप्त केले आहे. तसेच किती जण या रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आले होते याचेही रजिस्टर जप्त केले आहे. मात्र, गर्भपातासंदर्भात रजिस्टरमध्ये केवळ ८ लोकांची नावे आहेत. त्यामुळे बाकी ३ कवट्या कोणाच्या आहेत. याचा तपास सुरू आहे.

आर्वीतील 13 वर्षांची मुलगी 17 वर्षांच्या मुलासोबतच्या शारीरिक संबंधांतून गर्भवती झाली होती. आरोपी मुलाच्या आई-वडिलांनी गर्भवती मुलीच्या आई-वडिलांवर अवैध गर्भपातसाठी दबाव टाकत तिचा गर्भपात करण्याचा निर्णय घेतला. यासाठी मुलाच्या आई-वडिलांनी डॉ. रेखा कदम यांना पैसे दिले. याप्रमाणे डॉ. कदम यांनी 4 जानेवारीला संबंधित मुलीचा गर्भपात केला आणि रुग्णालयातील कर्मचार्‍याच्या मदतीने अर्भक गोबर गॅस टाकीत टाकून देण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा