क्षितिजा देव

आपला भारत हा शेतीप्रधान देश आहे. संक्रांतीच्या दिवशी सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो. असं म्हणतात की, सूर्याच्या रथाला सात घोडे लागतात आणि या दिवसापासून त्याचं उत्तरायण सुरू होतं. या उत्तरायणाचा पुढचा सहा महिन्यांचा काळ अत्यंत शुभ असतो. या दिवसापासून रात्र लहान आणि दिवस मोठा होतो. त्यामुळे शेतकर्‍यांना शेतीमध्ये काम करायला जास्त वेळ मिळतो आणि जास्त धान्य पिकवता येतं

संक्रांतीच्या सणाची गंमतच आहे. एखाद्या माणसाला आपण अगदी सरळ ‘गोड बोला’, असं सांगू शकतो. वर त्याच्या हातात तिळाची वडी ठेवली की मोकळेपणानं हसतो. एरवी असं आपण कोणाला सांगू शकतो का? मला वाटतं म्हणूनच हा सण एवढा लोकप्रिय असावा. या एका वाक्यानं दुरावलेली नाती जोडली जातात. शाळा-कॉलेजमध्ये एखादं भांडण होऊन दुरावलेल्या मैत्रिणीशी पुन्हा गट्टी करायला तिळगुळ देण्याचा हा राजमार्ग आपण कितीदा तरी वापरला होता. खरंच, किती छान सोय केली आहे नाही या सणानं!

यातून ‘फरगेट अँड फरगीव्ह’ हा संदेश मिळत असावा. नव्या ओळखी जोडण्यासदेखील तिळगुळ देणं हा गोड मार्ग आहे. विशेषतः तरुण प्रेमवीरांना याचा खूप उपयोग होत असावा! प्रेम करायला शिकवणारा, नातीगोती जोडणारा हा सण तसा भारतभर प्रिय आहे. तो ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं आणि नावानं साजरा होतो. पंजाबमधे लोहडी, आसाममध्ये भोगाली वा बीहू,उत्तराखंडमध्येउत्तरायणी, ओडिसामध्ये माघमेला, तामिळनाडूमध्ये पोंगल अशी वेगवेगळी नावं या सणाला आहेत. गुजरातमध्ये तर हा सण ‘पतंगनो तहेवार’ म्हणजेच पतंगाचा सण या नावानं प्रसिद्ध आहे. नावाप्रमाणेच तिथं त्यादिवशी पतंगाचा अनुपम महोत्सव चालतो. घरातले लहान-थोर, सगळीच माणसं वेगवेगळ्या आकारातले पतंग मनमुरादे उडवतात. आकाशात रंगीबेरंगी पतंगांची नेत्रदीपक रोषणाईच दिसते. ती पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात. अर्थात थंडीच्या या काळात अंगावर भरपूर ऊन घेणं हेच विज्ञान या प्रथेमागे आहे. शिवाय पतंग म्हणजे शुभ्रता, स्वातंत्र्य आणि आनंदाचं प्रतीकही मानलं गेलं आहे.

दक्षिण भारतात दुपारी घरोघरी अंगणात छोट्याशा चुलीवर खीर उकळायला ठेवतात आणि तिला उकळी आली की ‘पोंगल ओ पोंगल’ म्हणून आनंदानं ओरडतात. हिमालयाच्या सरूळ भागात तर गंमतच असते. तिथे पिठाला आकार देऊन तयार केलेले वेगवेगळ्या आकाराचे पक्षी तुपात तळतात आणि लहान मुलांच्या गळ्यात बांधतात. ते दुसर्‍या दिवशी कावळ्यांना खायला घालतात. अशा वेगवेगळ्या प्रांतातल्या वेगवेगळ्या गमतशीर प्रथा आहेत. आपल्याकडे मात्र संक्रांत म्हटलं की स्त्रियांचं हळदीकुंकू, लहान बाळाचं बोरन्हाण या गोष्टी डोळ्यासमोर येतात. शिवाय संक्रांतीच्या दिवसातला गुळाचे पदार्थ वापरून घेतला जाणारा आहार हा विज्ञानाच्या दृष्टीनं अत्यंत पोषक आहे.

तीळ आणि गूळ या दोन्ही पदार्थांमध्ये कॅल्शियमसारखे शरीराला उपयुक्त घटक मोठ्या प्रमाणात मिळतात. असा तिळगुळ आपल्या प्रिय व्यक्तीला देणं म्हणजे त्याच्या आरोग्याचं उत्तम चिंतन करणं, असंही प्रेम त्यातून व्यक्त होत असतं. एरवी ‘गाढवाला गुळाची चव काय’ असं गमतीनं म्हणत असलो तरी संक्रांतीच्या दिवशी मात्र आपण मोठ्या आवडीनं गुळाची पोळी तुपाबरोबर फस्त करतो. ही अवघड पोळी बनवताना गृहिणींचं कौशल्य पणाला लागत असतं. तिळाची वडी बनवण्याची प्रत्येक गृहिणीची पद्धतही वेगळी असते. त्यामुळे प्रत्येकीच्या वडीला वेगळीच चव येते. ती चाखण्याची मजा औरच असते. स्त्रिया नटून, काळ्या रंगाच्या साड्या नेसून मोठ्या हौसेनं हळदीकुंकू साजरं करतात. लहान बाळाला बोरन्हाण घालताना कौतुकानं काळे कपडे घातले जातात. या काळया कपड्यामागे सुद्धा वैज्ञानिक कारण आहे. ते असं की काळ्या रंगानं उष्णता शोषली जाते. असे कपडे थंडीत ऊब देतात. शिवाय ते नववधूला आणि छोट्या बाळाला दृष्ट लागण्यापासून वाचवतात अशीही कल्पना आहे.

आपला भारत हा शेतीप्रधान देश आहे. सक्रांतीच्या दिवशी सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो. असं म्हणतात की सूर्याच्या रथाला सात घोडे लागतात आणि या दिवसापासून त्याचं उत्तरायण सुरु होतं. या उत्तरायणाचा पुढचा सहा महिन्याचा काळ अत्यंत शुभ असतो, असं गीतेत सांगितलं आहे. या दिवसापासून रात्र लहान आणि दिवस मोठा होतो. त्यामुळे शेतकर्‍यांना शेतामध्ये काम करायला जास्त वेळ मिळतो आणि जास्त धान्य पिकवता येतं. त्याचा आनंद साजरा करण्यासाठी संक्रांतीचा हा सण साजरा करण्याची प्रथा शेतकर्‍यांमध्ये सुरु झाली. या दिवशी सूर्यदेवाचे उपकार मानण्यासाठी त्याची पूजा केली जाते. नामस्मरण, जप केला जातो. आपल्याकडे सूर्यप्रकाश म्हणजे आनंदाचं, मांगल्याचं प्रतीक मानलं जातं. बालकाला बोराचं न्हाण घालण्यामागेदेखील उज्ज्वल भवितव्यासाठी आशीर्वाद देणं हाच हेतू असतो.

आपल्या या शेतीप्रधान देशात मकर संक्रांत शेतीविषयक सण मानला गेला आहे. हळदीकुंकू करताना पूर्वीच्या सुवासिनी मातीच्या बोळक्यांमधे शेतीत पिकवणारं धान्य भरत असत. त्यामधे ऊस, हरभरा, बोरं, गव्हाच्या लोंब्या असायच्या. कारण तो दान देण्यातला एक महत्त्वाचा भाग मानला जायचा. याला ‘वाण देणं’ असं म्हणतात. एकूणच आपल्या संस्कृतीमध्ये दान देणं या गोष्टीला खूप महत्त्व आहे. आपल्याकडे आहे ते लोकांना द्यावं, सगळ्यांनी वाटून खावं यातच माणसाचं माणूसपण, सुसंस्कृतपण आहे या संस्काराची आठवण हे वाण लुटून, ठेवली जाते. कालमानानुसार अशा प्रकारचं दान देण्याच्या या प्रथेत बदल झाला. खेडेगावातली कुटुंबं अर्थार्जनासाठी शहरात आली आणि मग हळदीकुंकू करताना स्त्रिया शेतीच्या धान्याऐवजी इतर वस्तू वाणामध्ये देऊ लागल्या. सूर्यदेवानं आपल्या रथाला घोडे लावले तसंच जास्त सुशिक्षित झाल्यानंतर माणसाने आपल्या विचारांना जागृतीचे घोडे लावले. माणसाला आजच्या काळात कुठलं दान देण्याची गरज आहे याचं भान आलं. गृहिणीनं हळदी कुंकवासाठी खर्च न करता ते पैसे वाचवून घरातील कामवाल्या स्त्रीला आर्थिक मदत करणं सुरू केलं. हे करुन तिने सुधारणेचं उत्तम पाऊल उचललं असंच म्हणायला हवं. दान केवळ गृहिणीनं नव्हे तर प्रत्येक माणसानं द्यायला हवं. आजच्या काळात अन्नदानाइतकंच विद्यादान, रक्तदान, नेत्रदान, श्रमदान या दानांचं वाण देणंही गरजेचं आहे, हे माणसाच्या लक्षात आलं. कारण आजच्या नैसर्गिक आपत्तीनं कोसळू पाहणार्‍या लोकांसाठी, कुटुंबांसाठी ते अत्यावश्यक आहे.

अनेक दानशूर व्यक्तींनी आणि संस्थांनी गेल्या दीड-दोन वर्षांमध्ये कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना दत्तक घेऊन त्यांच्या पालनपोषणाची, शिक्षणाची जबाबदारी कायमस्वरूपी स्वीकारली. कित्येक कर्तव्यदक्ष, मायाळू शिक्षक गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षणाचा लाभ देत असतात. अनेक दानशूर व्यक्तींनी कायमस्वरूपी आणि विशेषतः कोरोनाच्या काळात गोरगरिबांसाठी विनामूल्य दवाखाने, अन्नछत्र चालवले आणि त्यांच्या मुलांसाठी मोफत विद्यालयं सुरू केली. काही समाजसेवी संस्थांनी आणि दानशूर व्यक्तींनी कोरोनाकाळात आई-वडील गमावणार्‍या अनाथ मुलांना कायमस्वरूपी दत्तक घेतलं आणि त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. एखाद्या मोठ्या अपघाताप्रसंगी रक्तदानाचं महत्त्व जाणणार्‍या अनेक कर्तव्यदक्ष व्यक्ती आहेत. जीवन-मरणाच्या सीमारेषेवर असणार्‍या अपघातग्रस्त माणसाला त्यांनी रक्तदान देऊन वाचवलं आहे. परिचयातल्या एका जागरूक नागरिकानं मृत्यूपश्चात नेत्रदान केलं होतं. त्यामुळे एका अंध तरुणाला दृष्टी मिळाली आणि त्याच्या आयुष्याचा स्वर्ग बनला. तेव्हाच नेत्रदानाचं महत्त्व मनात कायमचं घर करून बसलं.

श्रमदान हे सुद्धा माणसाचं माणूसपण जपणारं अत्यंत श्रेष्ठ दान आहे हे कोरोनाच्या काळात अनेक व्यक्तींनी स्वतःच्या कृतीतूनच दाखवून दिलं. या काळात डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस आणि समाजसेवी लोकांनी कुठलाही गाजावाजा न करता सर्वशक्तीनिशी श्रमदान केलं. अशा अनेक व्यक्ती जन्मभर समाजसेवेचं वाण देताना दिसतात. त्या जणू ईश्वरी अंशच असतात. चला तर मग, आपणही अशा विचारवंतांचे विचार अंगिकारण्याचा प्रयत्न करु.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा