केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे नागरिकांना आवाहन

नवी दिल्ली : ओमिक्रॉनची लक्षणे सौम्य असली तरी, कोरोनाच्या या उत्परिवर्तित विषाणूचा संसर्ग म्हणजे सर्दीचा आजार नव्हे, हे लक्षात घेऊन नागरिकांनी दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे, असा इशारा कोरोना कृती गटाचे प्रमुख व निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांनी गुरुवारी दिला. सध्या देशातील 300 जिल्ह्यांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत असून, संसर्गदरही 5 टक्क्यांहून अधिक आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

देशात 30 डिसेंबर रोजी कोरोनाचा संसर्गदर 1.1 टक्के होता, तो 12 जानेवारी रोजी 11.05 टक्क्यांवर पोहोचला आहे. या आकडेवारीवरून कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा झपाट्याने होऊ लागल्याचे स्पष्ट दिसते. जगभरात ओमिक्रॉनमुळे 115 रुग्ण, तर भारतात एक रुग्ण दगावला आहे. त्यामुळे ओमिक्रॉनकडे दुर्लक्ष करू नये, असे पॉल म्हणाले. लशीची एकही मात्रा न घेतलेल्या अनेकांना कोरोनाचा संसर्ग होत असून, त्यांना रुग्णालयांमध्ये उपचार घ्यावे लागत आहेत. पूर्ण लशीकरण झालेल्या 78 टक्के लोकांमध्ये कोरोनासंसर्ग होण्याची शक्यता कमी होते.

पोटदुखी ओमिक्रॉनचे नवे लक्षण

नवी दिल्ली : देशभरात कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन वेगाने पसरत आहे. ओमिक्रॉनची काही लक्षणे डेल्टापेक्षा वेगळी आहेत. काही जणांना सर्दी-खोकला, घशात खवखवसारखी लक्षणे दिसत आहेत. पण ताप न येता उलटी, मळमळ होणे आणि पोटदुखी होत असेल, तर हेदेखील ओमिक्रॉनचे लक्षण असू शकते.

तुम्हाला श्वसनासंबंधी लक्षण किंवा ताप न येताही पोटाची समस्या होत असेल तर कोविडची चाचणी करून घ्यावी. नव्या स्ट्रेनमध्ये जास्तीत जास्त लोकांना पोटाची समस्या आढळून आली आहे. लशीकरण झालेल्या नागरिकांमध्येही ही लक्षणे आढळून येत आहेत. कोविडच्या काही नव्या लक्षणांमध्ये मळमळ होणे, पोट दुखणे, उलटी, भूक न लागणे आणि जुलाब लागणे यांचाही समावेश आहे. गुडगावच्या फोर्टिस मेमोरिअल रिसर्च इन्स्टिट्यूटचे डॉक्टर मनोज गोयल म्हणतात, ’काही जणांना सुरूवातीला सर्दी-पडसे न होता केवळ पोटाची समस्या होऊ शकते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा