तीन प्रवाशांचा मृत्यू; अनेक जखमी

कोलकाता : पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी भागातील मॅनागुडीमध्ये गुवाहाटी-बिकानेर एक्स्प्रेस (15633) गुरुवारी संध्याकाळी 5 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास रुळावरून घसरून झालेल्या दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला. तर, अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. एक्स्प्रेस रेल्वे गाडीचे 12 डबे रुळावरून घसरले. ही एक्स्प्रेस बिहारच्या पाटणाहून आसाममधील गुवाहाटीला जात होती. रेल्वेसह प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून सध्या बचाव व मदतकार्य सुरू असून अनेक जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दुर्घटनेत प्रवाशांनी भरलेले 4 डबे उलटले. यामधील एक डबा पाण्यात गेला, ज्यामध्ये बरेच प्रवासी अडकले आहेत. जवळपासच्या कोणत्याही स्थानकावर एक्स्प्रेसचा थांबा नव्हता आणि एक्स्प्रेस त्या भागातून जात होती. सध्या एनडीआरएफसह स्थानिक बचाव कार्य पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. तसेच 30 ते 40 रुग्णवाहिका रवाना झाल्या आहेत. तसेच सिलीगुडीवरून बचावकार्य रेल्वे पाठवण्यात आली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी या अपघातासंदर्भात संपर्क साधून दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा