लष्कर प्रमुख नरवणे यांचा पाकिस्तानला इशारा

नवी दिल्ली : एकीकडे देशात कोरोनाच्या संकटाशी सामना सुरू असताना दुसरीकडे सीमाभागात पाकिस्तानकडून कागाळ्या सुरूच आहेत. सीमाभागात दहशतवादी वारंवार घुसखोरीचा प्रयत्न करत आहेत. भारतीय जवानांकडून त्यांचे प्रयत्न हाणून पाडले जात असले, तरी यातून पाकिस्तानचा छुपा अजेंडाच वारंवार सिद्ध होताना दिसत आहे. या सर्व मुद्द्यांवर भारताचे लष्कर प्रमुख एम. एम. नरवणे यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली. दहशतवादाच्या मुद्द्यावरून नरवणे यांनी पाकिस्तानला सज्जड दम दिला असून कारवाईसाठी भाग पाडल्यास मोठी किंमत वसूल करू, असेदेखील नरवणे यांनी म्हटले आहे.

भारत आणि चीनदरम्यान बुधवारी 14वी सैन्यस्तरावरील चर्चा आयोजित करण्यात आली होती. या चर्चेमध्ये लष्करप्रमुख नरवणेदेखील सहभागी झाले होते. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी सीमाभागातील घुसघोरी आणि पाकिस्तान, तसेच चीनसोबतचे भारताचे संबंध याविषयी भूमिका स्पष्ट केली.

जनरल नरवणे यांनी पाकिस्तानकडून सीमाभागत होणार्‍या दहशतवादी कारवायांवर तीव्र शब्दांत टीका केली. पश्चिमेकडील सीमाभागात, विशेषत: नियंत्रण रेषेजवळ सध्या परिस्थितीत सुधारणा होत असली तरीदेेखील या भागात दहशतवादी कारवाया वाढल्या असून नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचे प्रकार वाढले आहेत. यातून पश्चिमेकडील शेजारी देशाचे सुप्त मनसुबे उघड होत आहेत; पण आम्ही दहशतवाद खपवून घेणार नाही. आम्हाला भाग पाडण्यात आले, तर याची गंभीर किंमत वसूल केली जाईल, अशा शब्दांत लष्कर प्रमुखांनी पाकिस्तानला इशारा दिला. यावेळी चीनच्या सीमारेषेवरदेखील भारतीय लष्कर कोणत्याही कारवाईसाठी सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा