नवी दिल्ली : देशात कोरोनाची रुग्णसंख्या अतिशय वेगाने वाढत असल्याचे चित्र आहे. देशात गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 1 लाख 94 हजार 720 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, 442 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची एकूण रुग्णसंख्या 3 कोटी 60 लाख 70 हजार 510 वर पोहोचली आहे. यामध्ये 4 हजार 864 ओमिक्रॉनच्या रुग्णांचा समावेश आहे. देशातील सक्रिय रुग्णसंख्या 211 दिवसांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचली असून देशात सध्या 9 लाख 55 हजार 319 सक्रिय रुग्ण आहेत.

काल दिवसभरात 60 हजार 405 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. यासह पॉझिटिव्हिटी दर 11.05 टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, देशातील ओमिक्रॉन रुग्णसंख्या 4,868 एवढी झाली आहे. याआधीच्या दिवशी देशात कोरोनाबाधितांच्या वाढीचा आलेख थोडा स्थिरावल्याचे दिसून आले होते. सोमवारी दिवसभरात 1 लाख 68 हजार 63 कोरोनाबाधितांची भर पडली होती. तर, 277 रुग्णांचा मृत्यू झाला होता.

राज्यात ४६ हजार ७२३ नवे रुग्ण

गेल्या 24 तासांत राज्यात कोरोनाच्या 46 हजार 723 नव्या रुग्णांची भर पडली असून, 32 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात बुधवारी 28 हजार 041 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तत्पूर्वी, मंगळवारी 34 हजार 424 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्या तुलनेत तब्बल 12 हजार अधिक रुग्ण आढळून आले आहेत. तसेच, राज्यात ओमिक्रॉनच्या 86 रुग्णांची नोंद झाली असून, आतापर्यंत 1 हजार 367 आढळून आले आहेत.

शहरात ४ हजार ८५७ नव्या रुग्णांची नोंद

पुणे : पुणे शहरामध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्याप्रमाणावर वाढ होत आहे. बुधवारी शहरात 4 हजार 857 रुग्णांची नोंद झाली. तिसर्‍या लाटेमध्ये मोठ्याप्रमाणात रुग्ण वाढत असून संपर्कात आलेल्या रुग्णांची तपासणी करण्यासाठी केवळ 51 कर्मचार्‍यांची 24 पथकांवर महापालिकेची भिस्त आहे.

पुणे शहराची लोकसंख्या सुमारे 35 लाखांच्या आसपास आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची तपासणी करण्यासाठी सुमारे 300 ते 400 कर्मचार्‍यांची आवश्यकता आहे. महापालिका प्रशासनाने केवळ 24 पथकेच सध्या कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्याचा शोध घेत आहेत.

प्रशासनाने 14 डिसेंबर 2021 ते 9 जानेवारी 2022 दरम्यान 3 लाख 21 हजार 968 नागरिकांची तपासणी केली. यापैकी 54 हजार 25 नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी 7 हजार 696 कोरोना बाधीत आढळून आले आहेत. शहरातील नागरिकांची तपासणी करण्यासाठी 150 पथक असणे आवश्यक असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

राज्यात ४८१ निवासी डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग पसरत असल्याने रुग्णांची संख्याही वाढत आहे. यामध्ये डॉक्टरही कोरोनाबाधित आढळत असून राज्यातील सरकारी रुग्णालयांतील 481 निवासी डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. महाराष्ट्र निवसी डॉक्टर्स संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश दहिफळे यांनी यासंदर्भात माहिती दिली. राज्यात 481 डॉक्टरांना कोरोना झाल्याचे त्यांनी सांगितले.

केरळमध्ये १९९ मृत्यू

थिरूअनंतपूरम : केरळात कोरोना रुग्णसंख्येने बुधवारी १० हजारांचा टप्पा ओलंडला आहे. गेल्या 24 तासांत केरळात 12 हजार 742 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 199 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील सक्रिय रुग्णसंख्येनेही 50 हजारांचा टप्पा ओलंडला आहे. सध्या राज्यात 54 हजार 430 सक्रिय रुग्ण आहेत. या आधीच्या आठवड्यात सक्रिय रुग्णसंख्या 20 हजारांपर्यंत खाली आली होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा