केपटाऊन : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात मंगळवारपासून केपटाऊनमध्ये तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारताने पहिल्या डावात 77.3 षटकांत 223 धावा केल्या. यावेळी विराट कोहलीने 201 चेंडूत 79 धावा करत शानदार अर्धशतक साकारले. यावेळी त्याने 12 चौकार आणि 1 षटकार लगावला. तर त्याला साथ देताना पुजाराने 77 चेंडूत 43 धावा केल्या.

दोन्ही संघांमधील मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. यावेळी भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत इतिहास रचण्याची संधी आहे. टीम इंडियाला आजपर्यंत दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. अशा स्थितीत त्यांना प्रथमच येथे कसोटी मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. भारतीय कसोटी कर्णधार विराट कोहलीने केपटाऊनमध्ये पुनरागमन केले आहे. त्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मयंक अग्रवाल आणि केएल राहुल यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. भारताचे अर्धशतक पूर्ण होण्यापूर्वी हे दोघे तंबूत परतले. डुआन ऑलिव्हियर ने राहुलला (12) तर कगिसो रबाडाने एडन मार्करामला (15) झेलबाद केले. लंचपर्यंत विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी भारताचा डाव सावरला.

लंचनंतर भारताने शतक पूर्ण केले पण डाव गडबडला. चांगल्या लयीत खेळणार्‍या पुजाराला 43 धावांवर वेगवान गोलंदाज मार्को जानसेनने झेलबाद केले. त्यानंतर आलेला अजिंक्य रहाणे (9) रबाडाचा बळी ठरला. पुजाराने 7 चौकारांसह 43 तर रहाणेने 9 धावा केल्या. चहापानापर्यंत भारताने 54 षटकात 4 बाद 141 धावा केल्या. चहापानानंतर भारताने पंतच्या रुपात आपला पाचवा फलंदाज गमावला. जानसेनने पंतला 27 धावावर बाद केले.

विराटने संयमी अर्धशतक फलकावर लावले. 167 धावांत भारताने 5 फलंदाज बाद झाले. पंतनंतर रवीचंद्रन अश्विन फलंदाजीसाठी आला. विराट दुखापतीमुळे दुसर्‍या कसोटीतून बाहेर पडला होता. विराटच्या नेतृत्वाखाली भारताने या मालिकेतील पहिला सामना 113 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला होता. दुसर्‍या कसोटी सामन्यात भारताचा 7 गडी राखून पराभव झाला.

कोहलीच्या नावे विक्रम

विराट कोहलीने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या तिसर्‍या कसोटीच्या पहिल्या दिवशी त्याने उपाहारापर्यंत नाबाद 15 धावांची खेळी केली. यासह त्याच्या दक्षिण आफ्रिकेत कसोटीत 626 धावा आहेत. दक्षिण आफ्रिकेतील कसोटीत भारतासाठी सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो दुसर्‍या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने माजी कर्णधार आणि भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला मागे सोडले. आता तो फक्त सचिन तेंडुलकरच्या मागे आहे. तीन सामन्यांची मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे.

विराटने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेत 7 कसोटी सामन्यांच्या 13 डावात 52 च्या सरासरीने 626 धावा केल्या आहेत. त्याने 2 शतके आणि 2 अर्धशतके केली आहेत. त्याने या देशात 153 धावांची सर्वात मोठी खेळी साकारली आहे. आपला 49 वा वाढदिवस साजरा करणार्‍या राहुल द्रविडने 22 डावात एक शतक आणि 2 अर्धशतकांसह 624 धावा केल्या. भारताचे फक्त तीन फलंदाज 600 पेक्षा जास्त धावा करू शकले आहेत. विराटला 2 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावता आलेले नाही.

सचिन तेंडुलकरने दक्षिण आफ्रिकेत भारतीय फलंदाज म्हणून कसोटीत सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने 15 कसोटी सामन्यांच्या 28 डावात 46 च्या सरासरीने 1161 धावा केल्या आहेत. त्याच्याशिवाय अन्य कोणत्याही भारतीयाला 1000 धावांचा टप्पा गाठता आलेला नाही. सचिनने 5 शतके आणि 3 अर्धशतकेही केली आहेत.

भारताला अद्याप दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. नवा प्रशिक्षक राहुल द्रविड यावेळी इतिहास रचू इच्छितो. या मालिकेतील पहिली कसोटी भारताने जिंकली होती, तर दुसरी कसोटी यजमान दक्षिण आफ्रिकेने जिंकली.
दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

भारत – केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव

दक्षिण आफ्रिका – डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्कराम, कीगन पीटरसन, रुसी व्हॅन डर ड्यूसेन, टेम्बा बावुमा, काइल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को जानसेन, कगिसो रबाडा, केशव महाराज, डुआन ऑलिव्हियर, लुंगी एनगिडी.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा