पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांनी ऐतिहासिक वास्तू, किल्ले, स्मारके, पर्यटनस्थळे आणि धरणे या ठिकाणी पर्यटनास बंदी घातली आहे. या सर्व ठिकाणी एक किलोमीटर परिसरात पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्यात आठ जानेवारीपासून कठोर निर्बंध लागू करण्यात आले. राज्यातील सर्व उद्याने, प्राणिसंग्रहालये, वस्तू संग्रहालये, गड-किल्ले आणि स्थानिक पर्यटन स्थळे बंद राहतील, असे आदेश राज्य सरकारने दिले. जिल्हाधिकार्‍यांनी मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, जुन्नर, भोर आणि वेल्हा तालुक्यांतील ऐतिहासिक वास्तू, किल्ले, स्मारके, पर्यटनस्थळे, धरणे पुढील काही दिवस पर्यटनासाठी बंद राहतील, असे स्पष्ट केले. या ठिकाणी शनिवार, रविवार आणि सुटीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी आदेशात नमूद केले आहे.

या ठिकाणी गर्दी केल्यास, मद्यपान अथवा धोकादायक ठिकाणी वाहने थांबविल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात म्हटले आहे.
मावळ : भुशी धरण, घुबड तलाव, तुंगार्ली धरण, राजमाची पॉइंट, मंकी पॉइंट, अमृतांजन ब्रीज, वलवण धरण, वेहेरगाव, टायगर पॉइंट, लायन पॉइंट, शिवलिंग पॉइंट, कार्ला लेणी, भाजे लेणी, लोहगड किल्ला, तुंग किल्ला, विसापूर किल्ला, तिकोणा किल्ला आणि पवना धरण परिसर.
मुळशी : लवासा, टेमघर धरण परिसर, मुळशी धरण परिसर, पिंपरी दरी पॉइंट, सहारा सिटी, काळवण परिसर.
हवेली : घेरा सिंहगड, सिंहगड किल्ला, डोणजे, खडकवासला धरण परिसर.
आंबेगाव : डिंभे धरण, आहुपे पर्यटनस्थळ.
जुन्नर : शिवनेरी किल्ला, सावंड किल्ला, हडसर किल्ला, आंबे हातवीज, वडज धरण, माणिकडोह धरण, बिबटा निवारा केंद्र.
भोर : रोहडेश्वर गड, रायरेश्वर किल्ला, भाटघर धरण परिसर, निरादेवघर धरण, आंबवडे, भोर राजवाडा, मल्हारगड.
वेल्हा : तोरणा किल्ला, राजगड किल्ला, पानशेत धरण, वरसगाव धरण परिसर.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा