युवा लेखक प्रणव सखदेव यांना ‘काळे करडे स्ट्रोक्स’ या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार नुकताच जाहीर झाला. यानिमित्त त्यांचे मनोगत.

महत्त्वाचा आणि मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल आपली भावना काय?

  • आनंद आहेच, त्याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार. दुसरे कारण, ज्या ‘ काळे करडे स्ट्रोक’ कादंबरीसाठी हा पुरस्कार आहे ती समकालिन कादंबरी आहे. अनेक तरूण आज लिहीत आहेत. आपणही समकालाला भिडू शकतो, हा विश्वास त्यांच्या मनात निर्माण होण्यास मला मिळालेल्या पुरस्कारामुळे मदत होईल. हा पुरस्कार सर्व तरूण लेखकांना ऊर्जा देणारा ठरेल.

माझी कादंबरी तरूण पिढीबद्दल बोलते, विशेषतः खासगीकरण, आर्थिक उदारीकरण यामुळे सन 2000 नंतर जे बदल झाले त्याचा नव्या पिढीवर परिणाम झाला. या पिढीचा मानसिक आलेख, त्यांची स्पंदने, त्यांच्या मनातील खळबळ यावर ‘काळे करडे स्ट्रोक्स’ कादंबरी भाष्य करते. याची दखल घेतली गेली हे मला महत्त्वाचे वाटते.

समकालिन वास्तव साहित्यात उभे करणे आव्हानात्मक असते का?

  • होय, कारण समकाल सतत बदलत असतो! भूतकाळ स्थिर असतो, घटना घडून गेल्या असतात. तो काळ साहित्यात टिपणे तुलनेने सोपे असते. समकालात बदल एवढे झपाट्याने होत जातात की वास्तव मांडू पाहताना वास्तवाचा एखादाच तुकडा मिळतो! त्या पलीकडे खूप असते. सतत बदलणारे वास्तव लेखनात कसे आणायचे हे आव्हान असते. पूर्ण वस्तुस्थिती आपल्यापर्यंत येते असे नाही.

लेखक म्हणून आपली भूमिका काय आहे?

  • जे दिसते त्या पलीकडचा शोध घेणे ही मी जबाबदारी मानतो. निरीक्षण शक्ती हे तर लेखकाचे हत्यार आहेच, लेखकाकडे कल्पनाशक्तीही असते; पण एखादी घटना घडल्यावर त्याही पलीकडे खूप घटना घडलेल्या असतात. त्याचा मागोवा घेणे महत्त्वाचे असते. ‘मी अनुभव घेतला’, असे आपण सहज म्हणून जातो; पण अनुभवाबद्दलही शंका निर्माण करण्यासारखी स्थिती आहे. खरेतर समग्र आकलनासाठी ज्याला अनुभव म्हणतो त्याच्याही पलीकडे गेले पाहिजे.

वाचन, लेखन याची आवड कशी निर्माण झाली?

  • मी कल्याणचा. ज्याला अवांतर वाचन म्हणता येईल असे मी सातवीपर्यंत तरी केले नव्हते. खूप क्रिकेट खेळत असे. खेळत राहिलो असतो तर त्यात बर्‍यापैकी पुढेही गलो असतो. क्रिकेट आणि शाळा हेच माझे विश्व होते. आठवीत असताना अचानक पावसावर कविता सुचली! जो अनुभव घेतला त्याच्या पुनर्निमितीची गंमत समजली. कल्याणचे सार्वजनिक वाचनालय मोठे आहे. तेथील आमचे शेजारी राजीव जोशी यांनी वाचनाच्या दिशेकडे ओढले. वाचनालयातील पुस्तके पाहून थक्कच झालो. एवढी पुस्तके जगात आहेत? ही माझ्या मनातील प्रतिक्रिया होती! दहावीत आमच्या कोचिंग क्लासेसचे सर पंढरीनाथ भालेकर यांनी आम्हा विद्यार्थ्यांना घेऊन ‘बालविहंगम’ नावाचा दिवाळी अंक काढला होता. मी आधी कविताच लिहीत असे; पण रूईया कॉलेजमुळे जग विस्तारले. इंग्रजी वाचन वाढले. 2013 मध्ये ‘पायर्‍यांचा गेम व इतर कविता’ हा काव्यसंग्रह आला.

कथा, कादंबर्‍यांकडे कसे वळलात?

  • आपल्याला जे सांगायचे ते कवितेत पूर्ण व्यक्त होत नाही, ही जाणीव झाली. मग कथा लिहू लागलो. कथा, कादंबरीसाठी बैठक मारुन बसणे महत्त्वाचे असते. तो सराव व्हावा यासाठी भाषांतराची कामे सुरु केली.

मराठीतील कोणते लेखक भावतात?

  • बरेच! नेमाडे, चित्रे, भाऊ पाध्ये, विलास सारंग, सतीश तांबे, जयंत पवार, किरण गुरव, बांदेकर, कविता महाजन, मेघना पेठे असे अनेक. ते जास्त रिलेट होतात. जुन्या पिढीतील अरविंद गोखले, श्री.दा. पानवलकर, शरदचंद्र चिरमुले यांच्या कथा आवडतात.

लेखनामागची तुमची प्रेरणा कोणती?

  • कथा किंवा कादंबरी लेखन ही माझी आवड आहे. अवती भवती जे घडते त्याला प्रतिसाद द्यावासा वाटतो. शोध घेताना जे दिसते ते मला इतरांना सांगावेसे वाटते. तीच मुख्य असोशी असावी! लेखक थोडासा आत्ममग्न असतो. त्याच्यात थोडा अहंभाव असतो. त्याशिवाय तो लिहू शकत नाही! पुरस्कारामुळे जबाबदारी वाढली ही माझी भावना आहे. प्रोत्साहन म्हणून मी त्याकडे पाहतो.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा